५ हजारांची लाच घेताना तालुका समूह संघटक (BCM) लाचलुचपतच्या जाळ्यात!
- आशा वर्करच्या हक्काच्या प्रोत्साहन भत्ता बिलाची मंजुरी करून दिल्याचा मागितला मोबदला
- चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) धडक कारवाई
ब्रम्हपुरी :
आशा वर्कर म्हणून महिनाभर राबणाऱ्या महिलेच्या हक्काच्या प्रोत्साहन भत्ता बिलाची अंतिम तपासणी व पडताळणी करून ते बिल मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका समूह संघटक (BCM) सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे (वय ४० वर्षे, कंत्राटी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. ही धडक कारवाई काल, १० जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ (डिसेंबर महिना वगळून) या ६ महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कामाचे प्रोत्साहन भत्ता बिल मंजुरीसाठी पाठवले होते. त्यानुसार ९ मे २०२६ रोजी त्यांच्या पोस्टाच्या बँक खात्यात ३३,६३१/- रुपये जमा झाले. यानंतर तक्रारदार आशा वर्कर काही कामानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गेल्या असता, तेथील बीसीएम (BCM) सुदेश महाडोळे याने त्यांना अडवले. "मी तुझ्या ६ महिन्यांच्या बिलाची अंतिम तपासणी आणि पडताळणी करून ते समोर पाठविल्यामुळेच तुझे पैसे जमा झाले आहेत. म्हणून मी केलेल्या कामाचे ५,०००/- रुपये मला दे," अशी मागणी महाडोळे याने केली. तक्रारदाराने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली असता, "पैसे दिले नाही तर पुढच्या वेळी बिलात खोटी माहिती आहे असे सांगून बिल थांबवून ठेवीन," अशी धमकी महाडोळेने दिली.
लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने १० जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे जाऊन पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या पथकाने तात्काळ ब्रम्हपुरी येथे जाऊन लाच मागणी पडताळणी व सापळा कारवाईचे नियोजन केले. राज्यकर सहआयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथून दोन शासकीय पंचांना पाचारण करण्यात आले.
काल सायंकाळी ४:४० वाजताच्या सुमारास डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर लावून तक्रारदार आणि पंच क्रमांक १ यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले. तेथे सुदेश महाडोळे याने तक्रारदार महिलेला कार्यालयाच्या गॅलरीमध्ये नेऊन दोन बोटांचा इशारा करून पैशांची मागणी केली. तक्रारदाराने पर्समधून ५,०००/- रुपये (५०० रुपयांच्या १० नोटा) काढून महाडोळे याच्या हातात दिले. त्याने ते पैसे स्वीकारून आपल्या पॅन्टच्या मागील उजव्या खिशात ठेवले.
पैसे स्वीकारताच तक्रारदार महिलेने दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाला पूर्वनियोजित इशारा केला. पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कार्यालयात प्रवेश करून सुदेश महाडोळे याला ताब्यात घेतले.
एसीबी पथकाने कार्यालयातील लाईट्स बंद करून आरोपी सुदेश महाडोळे याचे दोन्ही हात आणि त्याच्या पॅन्टचा खिसा अल्ट्राव्हायलेट (UV) दिव्याच्या प्रकाशात तपासला असता, त्यावर रासायनिक पावडरची निळसर रंगाची चकाकी दिसून आली. तसेच जप्त करण्यात आलेल्या नोटांचे क्रमांकही आधीच नोंदवून घेतलेल्या क्रमांकांशी तंतोतंत जुळले. घटनास्थळावरून लाचेची ५,०००/- रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली पॅन्ट पुराव्यासाठी जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईचे डिजिटल व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल मोहनरेड्डी जिट्टावार यांच्या फिर्यादीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आरोपी सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन धर्मजवार, पोलीस अंमलदार रविकांत इंगळे, हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, प्रदीप ताडाम, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, मेघा मोहुर्ले, सतिष सिडाम आणि संदीप कौरासे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.