ट्रॅव्हल्स चालकाला बेदम मारहाण प्रकरणी सेवानिवृत्त ठाणेदारावर कोर्टाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल

   

ब्रम्हपुरी:
         ‘इथं आमचं राज चालणार!’ असा आव आणत खाजगी कपड्यात येऊन एका ट्रॅव्हल्स चालकाला बेदम मारहाण करणे ब्रम्हपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. पदाचा गैरवापर करत तक्रारही न नोंदवणाऱ्या या माजी ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश ब्रम्हपुरीच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पीडित चालकाला अखेर न्यायाची आशा दिसू लागली आहे.
          घटना २६ नोव्हेंबर २०२३ ची आहे. नागपूरचे ट्रॅव्हल्स चालक मोहन अडिवकर हे प्रवाशांना घेऊन गडचिरोलीहून नागपूरकडे निघाले होते. दुपारी ब्रम्हपुरी रेल्वे फाटकाजवळ गर्दी असताना, एका आकाशी रंगाच्या इनोव्हा कारमधून (MH-29-AR-8855) साध्या कपड्यात उतरलेल्या इसमाने मोहन यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पुढे ख्रिस्तानंद रुग्णालय चौकात या इसमाने मोहन यांना गाठले आणि वाहतूक पोलिसाची काठी हिसकावून त्यांच्या डोक्यावर व पायावर सपासप वार केले. मारहाणीत मोहन यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. नंतर कळाले की मारहाण करणारा तो इसम दुसरा कोणी नसून ब्रम्हपुरीचे ठाणेदार सुधाकर अंभोरे होते. अंभाेरे यांनी रक्ताळलेल्या अवस्थेतच मोहन यांना बस चालवत पोलीस ठाण्यात आणायला भाग पाडले. ठाण्यात आणल्यावर चालकाची 'ब्रेथ टेस्ट' निगेटिव्ह आली. तरीही एका वाहतूक पोलिसाने मोबाईलमधील घटनेचे रेकॉर्डिंग बळजबरीने डिलीट केले.
         रात्री घडलेल्या या प्रकारानंतर घाबरलेले मोहन अडिवकर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. पण तिथल्या अंमलदारांनी स्वतःच्याच वरिष्ठाची पाठराखण करत तक्रार घेण्यास साफ नकार दिला. विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी ठाणेदार अंभोरे ज्या इनोव्हा कारने आले होते, ती कार वणी येथील एका मटका किंगची असल्याची चर्चा परिसरात पसरल्याने या साटेलोट्यावरही प्रश्न उपस्थित झाले.
         पोलीस प्रशासनाने आपल्याच अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, पीडित चालकाने वकिलांमार्फत न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या अर्जाची (फौ.कि. अर्ज क्र. २८/२०२४) गंभीर दखल घेतली. न्यायालयाने CrPC १५६(३) अन्वये तत्कालीन ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्यावर IPC २९४, ३२४, ३४१, ५०४ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १४५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

  Post Views:   988


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी