ब्रम्हपुरी नगरपालिकेत 'पतीराजां'चा सुळसुळाट! लोकप्रतिनिधी महिला, पण कारभार मात्र 'कारभाऱ्यां'च्याच हाती?
नगराध्यक्षांच्या कॅबीनमध्ये ठिय्या; रोजंदारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करत सुटल्याने नागरिकांमधून संतप्त
ब्रम्हपुरी :
स्थानिक नगरपालिकेत सध्या जनतेने निवडून दिलेल्या महिला नगरसेविकांपेक्षा त्यांच्या पतीदेवांचाच वावर आणि रुबाब अधिक पाहायला मिळत आहे. पालिकेच्या कारभारात या 'पतीराजां'ची लुडबूड इतकी वाढली आहे की, जणू काही हेच अधिकृत नगरसेवक आहेत, अशा आविर्भावात ते वावरत आहेत. यामुळे पालिकेचा अधिकृत कारभार नेमका कोण चालवतंय? असा संतप्त सवाल आता ब्रम्हपुरीतील सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ब्रम्हपुरी नगरपालिकेत सध्या काँग्रेसची एकहाती सत्ता असून नगराध्यक्षांसह एकूण २१ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे आहेत. यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे दोन स्वीकृत सदस्य आहेत. एकूण सदस्यसंख्येपैकी तब्बल १२ महिला नगरसेवक पालिकेत प्रतिनिधित्व करत आहेत. महिलांना राजकारणात आणि सत्तेत समान संधी मिळावी या उद्देशाने आरक्षण देण्यात आले असले, तरी ब्रम्हपुरी पालिकेत मात्र काही महिला नगरसेविकांचे पतीच संपूर्ण सत्तेचा रिमोट कंट्रोल हाती घेऊन बसल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिला नगरसेविका आपल्या वार्डात फिरण्याऐवजी त्यांचे पतीच वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकत आहेत. एवढ्यावरच न थांबता, आपणच नगरसेवक असल्यासारखे ते नागरिकांना विविध कामांची आश्वासनेही देत सुटले आहेत. त्यामुळे जनतेने मतदान नेमके कोणाला केले आणि कामे कोणाकडून करून घ्यायची, असा संभ्रम वार्डात निर्माण झाला आहे.
या पतीराजांचा हैदोस केवळ वार्डापुरता मर्यादित नसून, त्यांनी थेट नगरपालिकेच्या मुख्य इमारतीवर आणि प्रशासनावरही कब्जा मिळवण्यास सुरुवात केली आहे. पालिकेत आपल्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या मते, या १२ महिला नगरसेविकांपैकी काही नगरसेविकांचे पती दररोज पालिकेत येऊन ठाण मांडून बसतात. चक्क नगराध्यक्षांच्या मुख्य कॅबीनमध्ये बसून पालिकेतील शासकीय कर्मचाऱ्यांना विविध कामांचे फर्मान सोडण्याचे धाडस हे पतीराज करत आहेत.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, कोणत्याही अधिकृत पदावर नसताना हे पतीराज नगरपालिकेत काम करणाऱ्या गरीब रोजंदारी कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. अनेकदा या कर्मचाऱ्यांना खालच्या पातळीवर जाऊन टोचून बोलले जाते, त्यांच्यावर विनाकारण रुबाब झाडला जातो. यामुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्येही आतल्या आत तीव्र असंतोष खदखदत आहे.
या सर्व प्रकारामुळे ब्रम्हपुरीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, त्यांनी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना काही रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. कुठल्याही अधिकृत पदावर नसताना या नगरसेविकांच्या पतींना नगरपालिकेत बसू देण्याचा आणि शासकीय कामात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला? नगराध्यक्षांच्या कॅबीनचा वापर खाजगी दरबारासारखा का केला जात आहे? पालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना खालच्या पातळीवर बोलण्याचा अधिकार या पतीराजांना कोणी दिला? महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारल्या जात असताना ब्रम्हपुरीत मात्र 'महिला पुढे आणि पती मागे' ऐवजी 'पती पुढे आणि महिला गायब' असेच चित्र पाहायला मिळत आहे. आता या वाढत्या लुडबुडीवर पालिकेचे प्रशासन किंवा वरिष्ठ नेते काही लगाम लावणार की 'पतीराजां'चा हा समांतर कारभार असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.