आवळगाव येथील २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ब्रह्मपुरी :
तालुक्यातील आवळगाव येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गौरव हेमंत भोयर (वय २२) या तरुणाने राहत्या घराशेजारील एका पडक्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव भोयर हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. सोमवारी रात्री गावात महाशिवरात्रीनिमित्त नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गौरव रात्री उशिरापर्यंत गावातच होता. मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याने घराशेजारील एका जुन्या पडक्या घरात जाऊन छताच्या मयालीला नायलन दोरीने गळफास लावून घेतला.
सकाळी गौरव घरात दिसला नसल्याने, तो गावातच असावा, असा घरच्यांचा समज झाला. मात्र, सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास त्याची बहीण काही कामानिमित्त शेजारील पडक्या घराकडे गेली असता, तिला गौरव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहताच तिने एकच हंबरडा फोडला, त्यानंतर गावकरी घटनास्थळी धावून आले.
उत्सवाचे वातावरण असलेल्या आवळगावमध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत गौरवच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. ऐन उमेदीच्या काळात तरुण मुलाने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.