पुन्हा एक अवैध सावकारीचा बळी

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
 ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध सावकाराकडून शेतकर्‍याची पिळवणूकीचे प्रकरण ताजे असतांना, ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात याच प्रकरणातील एका अवैध सावकारा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार दादाजी बावणे वय ३२, रा. सोनेगाव असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी अवैध सावकारी, शिवीगाळ तसेच आर्थिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (रा. ब्रह्मपुरी) याच्याविरोधात ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात काल दिनांक १९ डिसेंबर ला तक्रार दाखल केली आहे.
 सन २०२२-२३ दरम्यान राजकुमार बावणे हे सिटीग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत होते. त्या काळात कंपनीतील काही लोक शेतकर्‍यांची फसवणूक करून पळून गेले. ओळखीपोटी शेतकर्‍यांनी गुंतवलेले पैसे मागितल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या फिर्यादी राजकुमार बावणे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये आरोपी लक्ष्मण पुंडलीक उरकुडे याच्याकडून ४ लाख रुपये १२ टक्के व्याजाने घेतले. परतफेड करण्याकरीता फिर्यादी राजकुमार बावणे यांनी १ लाख ५० हजार रूपये २० टक्के व्याज दराने, ३ लाख रूपये १३ टक्के व्याजाने असे एकुण ८ लाख ५० हजार रूपये देण्याकरीता कर्ज फेडण्यासाठी फिर्यादी बावणे यांनी मुथूट मनी, सोनारांकडे दागिने गहाण ठेवून नातेवाईकांकडून पैसे उचलून एकूण ३१ लाख ४२ हजार ६०० रुपये आरोपी लक्ष्मण उरकुडे याला दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. 
 तरीही आरोपी लक्ष्मण उरकुडे याने ४० लाख रुपयांची खोटी थकबाकी दाखवून डिसेंबर २०२५ पर्यंत पैसे मागण्याचा तगादा फिर्यादी बावणे यांच्याकडे लावला. याप्रकरणी फिर्यादी बावणे यांनी अवैध सावकारी, शिवीगाळ तसेच आर्थिक व मानसिक छळणूक केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात केली. आरोपी लक्ष्मण उरकुडे विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (५), महाराष्ट्र सावकारी अधिनियम ३९ व ४४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.

  Post Views:   2407




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी