ब्रम्हपुरी येथे अवैध सावकारी करणाऱ्या अमरसिंग टाकवर गुन्हा दाखल; घरझडतीमध्ये डायऱ्या आणि कोरे चेक जप्त

   

ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी :
              ब्रम्हपुरी शहरात विनापरवाना आणि अवैध सावकारी करून कर्जदारांना धमकावणाऱ्या आणि मानसिक त्रास देणाऱ्या अमरसिंग लक्ष्मणसिंग टाक (वय ५८ वर्ष, रा. गुरुद्वाराजवळ, फुलेनगर, ब्रम्हपुरी) याच्याविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ब्रम्हपुरीचे स्वप्नील बाळासाहेब पाटील (वय ४८ वर्षे) यांच्या लेखी तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीच्या घरातून अवैध सावकारीशी संबंधित महत्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
          काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथून सहाय्यक निबंधक कार्यालयाला पत्र प्राप्त झाले होते. त्यासोबत ब्रम्हपुरी येथील रहिवासी पूजा धम्मदीप हुमने आणि रमेश गंगाधर बोबडे यांनी अमरसिंग टाक हा अवैध सावकारी करून मानसिक त्रास देत असल्याबाबतचे तक्रार अर्ज जोडले होते. या तक्रारींच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक कार्यालयाने दोन्ही अर्जदारांना बोलावून त्यांची खातरजमा केली व १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यांचे स्वयंघोषणापत्र लिहून घेतले.
        रमेश गंगाधर बोबडे (वय ६६ वर्षे) यांनी गृहउपयोगी वस्तूच्या व्यवसायासाठी जानेवारी २०२६ मध्ये अमरसिंग टाक याच्याकडून १,२५,००० रुपये रोख घेतले होते. यासाठी दररोज २,७५० रुपये प्रमाणे ६० दिवसांत रक्कम परत करण्याचे ठरले होते. बोबडे यांनी आतापर्यंत ६५,५५० रुपये परत केले आहेत. मात्र, अमरसिंग टाक हा मुद्दल १,२५,००० रुपये आणि रोजचे २,७५० रुपये याप्रमाणे संपूर्ण पैशांसाठी दबाव आणून शिवीगाळ व धमक्या देत होता. तसेच 
सौ. पूजा धम्मदीप हुमने (वय २९ वर्षे) यांनी सुद्धा मुलाच्या आजारपणासाठी त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये ३०,००० रुपये ऑनलाइन घेतले होते. आतापर्यंत त्यांनी ३१,००० रुपये (रोख व ऑनलाइन) परत केले आहेत. तरीही अमरसिंग टाक हा त्यांच्यावर अजून ७२,००० रुपये बाकी असल्याचे सांगून पैसे वसुलीसाठी मानसिक त्रास व धमक्या देत होता.
           मिळालेल्या तक्रारींच्या आधारे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ नुसार सहाय्यक निबंधक कार्यालयाने एक शोध पथक तयार केले. दोन पंचांची नियुक्ती करून आणि पोलीस बंदोबस्त घेऊन १४ जुलै २०२६ रोजी अमरसिंग टाक याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात लोकांना व्याजाने पैसे दिल्याबाबतच्या नोंदी असलेल्या ११ डायऱ्या (नोंदवह्या).
दैनंदिन वसुलीच्या नोंदी असलेले एक पासबुक आणि एक कोरे लहान पासबुक, नोंदवह्यांमध्ये सापडलेले ०६ स्वाक्षरी केलेले कोरे चेक (ज्यावर रक्कम व दिनांक नमूद नव्हता) आदी दस्तावेज त्यांना सापडले.
            अमरसिंग लक्ष्मणसिंग टाक हा कोणत्याही वैध परवान्याशिवाय (लायसन्स) अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी सहाय्यक निबंधक स्वप्नील पाटील यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी अमरसिंग टाक विरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ आणि भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांन्वये ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

  Post Views:   1167


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी