‘‘घिबली आर्ट’’ची नेटकर्यांना भुरळ, तज्ञांकडून चिंता व्यक्त
चॅट जिपीटीवरून फोटो बनविण्याचा नवा ट्रेंड
ब्रम्हपुरी/का.प्र.
इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर अॅनिमेटेड फोटोचा ट्रेंड सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर घिबली ट्रेंडची जादू पसरलेली आहे. जिथे पहावं तिथे लोक या घिबली स्टाईलमध्ये त्यांचे फोटो तयार करत आहेत. याद्वारे युजर्स आपले नॉर्मल फोटो स्टुडिओ घिबलीच्या सुंदर अॅनिमेशन स्टाईलमध्ये बदलू शकतात. अनेक जण ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि एक्स वरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीनं फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हा ट्रेंड नेटकर्यांकडून फॉलो केला जात आहे. सर्वच क्षेत्रातील दिग्गज देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत फोटो शेअर करीत आहेत.
स्टुडिओ घिबली हे एक इमेज जनरेशन टूल आहे. चॅट जीपीटीच्या या वैशिष्ट्याद्वारे, युजर्स त्यांचा कोणताही आवडता फोटो, चित्रपटातील फोटो किंवा कोणत्याही लोकप्रिय मीमला स्टुडिओ घिबलीच्या फोटोमध्ये रूपांतरित करू शकतात. नुकतेच ओपन एआयने चॅट जीपीटी प्लस, प्रो आणि टीम वापरकर्त्यांसाठी इमेज जनरेशन फीचर लाँच केलं आहे, ज्यामुळे इंटरनेटवर नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे खरे फोटो जपानच्या प्रसिद्ध स्टुडिओ घिबलीच्या अॅनिमेटेड स्टाईलमध्ये करू शकता. घिब्ली कला म्हणजे स्टुडिओ घिब्लीच्या अनोख्या शैलीतील छायाचित्रे आहेत. ज्यामध्ये पेस्टल आणि म्यूट कलर पॅलेट आणि गुंतागुंतीच्या तपशीलांचा वापर केलेला असतो.
घिबली हा जपानमधील सर्वात मोठा अॅनिमेशन स्टुडिओ आहे. या स्टुडिओची स्थापना हायाओ मियाजाकी, इसाको ताकाहाता तोशियो सुझुकी यांनी १९८५ मध्ये केली होती. घिबली स्टुडिओनं बनवलेल्या अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. या स्टुडिओचे चित्रपट नेटफ्लिक्स वर आहेत. अॅनिमेशन जगातील बादशाह अशी ओळख मियाजाजाकी अशी आहे.
डिजिटल प्रायव्हसीसंदर्भात तज्ज्ञांनी केली चिंता व्यक्त :
डिजिटल प्रायव्हसीसंदर्भात ओपन एआय च्या घिबली एआय आर्ट जनरेटरबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, एआय प्रशिक्षणासाठी हजारो पर्सनल फोटोंमध्ये प्रवेश करण्याचा हा डाव असू शकतो. हा ट्रेंड व्हायरल झाला आहे, परंतु तज्ज्ञांचं असं मत आहे की, युजर्स नकळतपणे ओपन एआय ला डेटा देत आहे आणि यामुळे त्यांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. कंपनीला वेब-स्क्रॅप केलेल्या डेटावरील कायदेशीर निर्बंध डावलून युजर्स स्वेच्छेने सबमिट केलेले फोटो मिळविण्यास अनुमती देते. जिडीपीआर नियमांनुसार,ओपन एआय ला इंटरनेटवरून फोटो स्क्रॅप करण्यासाठी ‘कायदेशीर हित' योग्य ठरवावे लागेल, ज्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपायांची आवश्यकता आहे. परंतु जेव्हा युजर्स स्वत: फोटो अपलोड करतात, तेव्हा ते परवानगीही देतात, ज्यामुळे एआय ला डेटावर प्रक्रिया करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळते.
युजर्ससाठी नेमका धोका कोणता?
एकदा युजर्सनी आपले फोटो सबमिट केले की, त्या फोटोंच्या वापरावरील नियंत्रण सुटते, असा इशारा तज्ज्ञ देतात. एआय च्या गोपनीयता किंवा प्रायव्हसी धोरणात असे म्हटले आहे की, युजर्सच्या इनपुटचा वापर मॉडेल प्रशिक्षणासाठी केला जाऊ शकतो जोपर्यंत ते त्यातून बाहेर पडत नाहीत, परंतु याचे दीर्घकालीन परिणाम अस्पष्ट आहेत. यामुळे तज्ज्ञ अनेक धोके दाखवतात.
घिबली आर्टचे धोके कोणते?
गोपनीयतेचा भंग: युजर्सचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकतात. ओळख चोरी : फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची ओळख चोरली जाऊ शकते. डेटा सिक्युरिटी : युजर्सची माहिती सुरक्षित राहू शकत नाही आणि हॅकिंगला बळी पडू शकते. चुकीचा वापर : फोटोंचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो, जसे की फेक प्रोफाइल तयार करणे. ही जोखीम लक्षात घेऊन युजर्सनी आपले फोटो शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे.