कौटुंबिक वादाचा भीषण अंत: पोटच्या मुलानेच वडिलांचा लोखंडी सब्बलने वार करून केला खून

ब्रह्मपुरी तालुक्यातील खळबळजनक घटना
   

ब्रह्मपुरी/ महेश पिलारे :
             ब्रह्मपुरी तालुक्यातील डोर्ली गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या चिमुकल्या मुलीला आजी-आजोबांकडे झोपवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून, एका मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध वडिलांची लोखंडी सब्बलने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
            आरोपी किशोर दादाजी ठाकरे (वय ४०) हा जिवती येथील एका आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याला दारूचे व्यसन जडल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून कामावर नियमित जात नव्हता. याच व्यसनामुळे त्याचे पत्नीशी वारंवार खटके उडत होते, ज्यामुळे त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती. त्यांची ६ वर्षांची मुलगी अनुश्री ही आपल्या आजी-आजोबांकडेच राहत होती. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास आरोपी किशोर गावातील एका बारशाच्या कार्यक्रमातून जेवण करून घरी परतला. यावेळी त्याने आपली मुलगी अनुश्री हिला आपल्यासोबत घरी पाठवण्याचा हट्ट धरला. मात्र, मुलगी तिच्या आजोबांकडे (दादाजी ठाकरे) झोपली होती. या साध्याशा कारणावरून किशोरचा पारा चढला.       
          मुलगी आपल्यासोबत आली नाही, या रागातून किशोरने रात्री ९ वाजेच्या सुमारास हॉलमध्ये झोपलेल्या दादाजी बक्षी ठाकरे (वय ६५) यांच्यावर लोखंडी सब्बलने जोरदार वार केले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे दादाजी ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील वादाचे रूपांतर इतक्या भीषण हत्याकांडात होईल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.
              घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस तातडीने डोर्ली गावात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
आरोपी किशोर दादाजी ठाकरे याला ब्रम्हपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल.
              सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बानबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण पुढील तपास करत आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने जन्मदात्या पित्याचाच बळी घेतल्याने गावावर शोककळा पसरली असून, कौटुंबिक वादाचे हे हिंसक स्वरूप पाहून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

  Post Views:   1764




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी