नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात!

   


  • काँग्रेस : माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे व योगेश मिसार यांच्यात रस्सीखेच

  • भाजप : माजी नगरसेवक विलास विखार विषयी भाजपात नाराजी

ब्रम्हपुरी/महेश पिलारे

  राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर केल्या. ब्रम्हपुरी नगर पालिकेसाठी ०२ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी दि. ०४ नोव्हेंबर मंगळवार पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकीतून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून द्यावयाचा आहे. ब्रम्हपुरी नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगरध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठीत व्यापारी योगेश मिसार यांची नावे समोर येत असून, यांच्यात रस्सीखेच पहावयास मिळत आहे. तर याउलट भाजपाकडून माजी नगरसेवक विलास विखार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून शर्यतीत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षात माजी नगरसेवक विलास विखार यांच्या विषयी नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचाच हा वृत्तांत.
 राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या असून आचारसंहिता मंगळवारपासून लागू केली आहे. ०२ डिसेंबरला होणार्‍या ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार कोण? याविषयी राजकीय पक्षाकडून अद्यापही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. काँग्रेस पक्षाकडून लोकचर्चेवरून माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठीत व्यापारी योगेश मिसार यांची नावे सामोर येत आहेत. काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक म्हणून माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांची ओळख आहे. तर ब्रम्हपुरी तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यापारी, समाजसेवक तथा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून योगेश मिसार सर्वपरिचीत आहेत. या दोघांत रस्सीखेच असून पक्षश्रेष्ठी विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार हे या दोघांतून कोणाला अधिकृत उमेदवार म्हणून कौल देतात, या विषयी जनतेच्या मनात उत्सूकता आहे. दोन्ही तोडीचे उमेदवार असून दोघांची प्रतिमा स्वच्छ व जनतेविषयी आपूलकी निर्माण करणारी आहे. 
 तर माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या गोटातून माजी नगरसेवक मनोट वठे, माजी नगरसेवक मनोज भूपाल, भाजपा शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, भाजपा माजी शहराध्यक्ष अरविंद नंदूरकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक विलास विखार हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार असले तरी त्यांचे नाव चिमूरचे विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडीया यांच्याकडून समोर करण्यात आले आहे. माजी नगरसेवक विलास विखार यांनी सहा महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अशा नवागतांना (नव प्रवेशीत) नगराध्यक्ष पदासाठी पक्षाची उमेदवारी मिळाल्यास निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची भावना उफळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देशकर गटातून सुयोग बाळबुद्धे व मनोज भूपाल यापैकी एकाची उमेदवारी करीता निवड होण्याची अधिक संभावना आहे. याविषयी पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात? याकडे जनतेचे लक्ष आहे.  
 महायुतीतील शिवसेना पक्षाने स्थानिक स्तरावर निवडणूका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना पक्षाकडून नरू नरड हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करीता अर्ज दाखल करणार असल्यचे समजते. याउलट अन्य पक्षांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

  Post Views:   3072




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी