पाकला वठणीवर आणाच!

   

 पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाच, जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करून, मूळ स्वभावाचे दर्शन पुन्हा घडवले. अर्थात, भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देऊन, मर्यादा ओलांडल्यास काय घडेल, याचे संकेत दिलेच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये बांदीपुरा येथे सुरक्षा दलाने एका दहशतवाद्यास ठार मारले, तर दोन दहशतवाद्यांची घरे उद्धस्त केली. सार्क व्हिसाअंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून, मुदत संपण्यापूर्वी त्यांची मायदेशी रवानगी करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. महाराष्ट्रात राहणार्‍या पाक नागरिकांची यादी तयार असून, सर्व पोलिस स्थानकांना त्यांची रवानगी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने सूचना दिल्या. भारतातील एकूण एक पाकिस्तान्यांना येथून हाकलूनच लावले पाहिजे, हे सरकारचे धोरण सुसंगतच आहे. इतकेच नाही तर मंत्री शहा यांनी सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाऊ न देण्याचा निर्धार केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. यावर सिंधू जल करार रद्द करण्याच्या भारताच्या भूमिकेने पाकिस्तान धास्तावला असून पहलगाम हल्ल्याच्या कोणत्याही नि:पक्ष चौकशीत सहभागी होण्याची तयारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दर्शवली आहे. 
 लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. काही ठिकाणी युद्धसरावही सुरू असून, पाकिस्तानला जन्मभर लक्षात राहील, असा धडा शिकवण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या संसदेने पहलगामकांडाचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याचा भारताचा प्रयत्न नाकारणारा ठराव मंजूर केला. निष्पाप नागरिकांना मारणे, हे पाकने राखलेल्या मूल्यांच्या विरुद्ध असल्याचे या ठरावात म्हटलेले आहे. वास्तविक पाकिस्तानच्या स्थापनेपासून त्या देशाने भारतात वारंवार घुसखोरी करून, ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवले. पोलिस आणि लष्करी जवानांच्या हत्या केल्या. तसेच असंख्य निष्पाप नागरिकांची हत्या केली. एकीकडे पहलगाममधील घटनेचा पाकशी काही संबंधच नाही, असा ठराव तेथील संसद मंजूर करत असतानाच, हा हल्ला करणारे लोक स्वातंत्र्यसैनिक असू शकतात, असे संतापजनक उद्गार पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसहाक दार यांनी काढले. भारताकडे या हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याचे पुरावे असतील, तर त्याने ते जगासमोर सादर करावे, असे दार यांनी म्हटले आहे. यापूर्वी २६-११ मध्ये पाकचा हात असल्याचे पुरावे देऊनही तेथील सरकारने त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. उलट मुंबई हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानमध्ये मोकाटपणे फिरत आहेत. शिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकताच दहशतवाद्यांचा मेळावा झाला आणि भारतास जाहीरपणे धमक्याही देण्यात आल्या. पाकिस्तान सरकारच्या आशीर्वादाविना असा मेळावा होणे शक्य नाही. 'पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे, त्यांना प्रशिक्षण व निधी देणे हा आमचा प्रदीर्घ इतिहास आहे गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत', अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीच दिल्याने पाकचा बुरखा पुन्हा एकदा फाटला. 
 १९७९ ते १९८९ या दशकात सोव्हिएत सैन्य अफगाणिस्तानात असताना, बंडखोर मुजाहिद्दींना अमेरिका शस्त्रास्त्रांची मदत करत होती आणि या 'लढ्यात' पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश होता. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर पाक दहशतवादी मोकळे झाले. त्यानंतरच्या काळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरात जवळपास ७० हजार लोकांच्या हत्या केल्या. या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे उद्धस्त करण्याची भाषा पूर्वी भारत करत असे, तेव्हा अमेरिका सबुरीचा सल्ला देत होती. मात्र अफगाणिस्तानातील युद्ध संपल्यानंतर पाकिस्तान स्वतंत्रपणे सीमापार दहशतवादी कारवाया करू लागला. त्यामुळे या सर्व भारतविरोधी कृत्यांचे खापर अमेरिकेवर फोडून, पाकिस्तानला हात वर करता येणार नाहीत ! २९ सप्टेंबर १९८१ रोजी इंडियन एअरलाईन्सचे श्रीनगरहून दिल्लीला निघालेले विमान खलिस्तानवाद्यांनी पळवून लाहोरला नेले. या अपहरणकर्त्यांना लाहोर येथील नानकाना साहिब गुरुद्वारात ठेवून, तिथून पाकिस्तानने पंजाबातील कारवाया सुरू केल्या होत्या. भिंद्रनवालेचा उदय झाल्यानंतर, पंजाबमधील खलिस्तानवाद्यांना पाकने शस्त्रास्त्रे, दारूगोळा व निधीही पुरवला. पाकचे लष्करशहा झिया-उल-हक यांनी आयएसआयमार्फत पंजाब व काश्मीरमध्ये दहशतवादाची पेरणी केली. राजीव गांधी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर 'ऑपरेशन बासट्रॅक्स' हाती घेऊन, पाकिस्तानच्या सीमेलगत लष्कराच्या १० डिव्हिजन्स आणि ३ ब्रिगेडस् आणून ठेवल्या. त्यावेळी पाकिस्तान भयभीत झाला होता. गरज पडल्यास, आम्ही अणुबॉम्बचाही वापर करू, अशी धमकी पाकिस्तानचे मुख्य अणुवैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांनी दिली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली २०१८ मध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिली होती. पाकिस्तानच्या भूमीत ३० ते ४० हजार दहशतवादी आहेत, हे २०१९ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमान खान यांनी आपल्या अमेरिका भेटीत कबूल केले होते. पाकिस्तानमध्ये नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स आहेत आणि ते भारतविरोधी कृत्यांत सामील असतात, अशी कबुली पाकचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी पूर्वीच दिली आहे. 
 अल-कायदा, लष्कर-ए-उमर, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, सिपाह-ए-साहबा, जैश-उल-अद्दल, अल-बद्र-मुजाहिद्दीन, हरकत उल-मुजाहिद्दीन आणि इसिस-केपी या दहशतवादी संघटनांच्या दृष्टीने पाकिस्तान हे सुरक्षित केंद्र आहे. पाकिस्तानच्या भूमीने लादेनलाही आसरा दिला होता. अमेरिकेच्या कळत अथवा नकळत पाकिस्तानने भारताच्या विरोधात कारस्थाने रचली आहेत. त्यामुळे मुजोर पाकिस्तान हे भारताच्या दृष्टीने शत्रूराष्ट्रच असून, त्याची मस्ती वेळीच जिरवावी लागेल. केंद्रातील सरकारला देशाचे दहशतवादविरोधी धोरण दाखवून देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

  Post Views:   18



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी