ब्रम्हपुरी वनविभागाच्या नर्सरीला आग
नागरिकांच्या तत्परतेने अनर्थ टळला
ब्रह्मपुरी/का.प्र.
तालुक्यातील खेड हद्दीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मागील वनविभागाच्या नर्सरीत मंगळवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
ही आग काही क्षणातच झपाट्याने पसरली. त्यामुळे नर्सरी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नागरिक व वनविभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नर्सरीला लागूनच वस्ती असल्याने आग लागल्याचे लक्षात येताच गावकर्यांानी तत्काळ धाव घेतली. खेड येथील लंकेश दाणी, सुखदेव मेश्राम आणि रामकृष्ण मेश्राम यांनी आपल्या घरातील बोरवेलला पाईप लावून पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्य दीपक देशमुख व किशोर लाडे अध्यक्ष ग्रामसुरक्षा दल यांनीदेखील वनविभागाच्या कर्मचार्यां सह नागरिकांना समन्वय साधून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे अग्निशमन वाहन येईपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, ब्रह्मपुरीजवळच असलेल्या कहाली गावात तणसीच्या दोन ढिगार्यांमना आग लागल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. येथेसुद्धा अग्नीशमन दलाने आगीवर लगेचच नियंत्रण मिळविले.