५० हजारांच्या इलेक्ट्रिक वायर चोरीचा गुन्हा उघड; ३ आरोपींना अटक, वाहनांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!
ब्रम्हपुरी :
स्थानिक ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हळदा येथील एका घराच्या अंगणातून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेणाऱ्या आंतर-तालुका टोळीचा ब्रम्हपुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह एकूण ३,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नान्होरी (ता. ब्रम्हपुरी) येथील रहिवासी आणि इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर गणेश बाळकृष्ण मिसार (वय ३६ वर्षे) यांनी आपले कंत्राटाचे इलेक्ट्रिक साहित्य (अंदाजे २ किमी अंतराचा इलेक्ट्रिक कंडक्टर, ५० किलो स्टे-वायर आणि ५० किलो जी.आय. वायर, एकूण किंमत ६०,००० रुपये) हळदा येथील श्री. मुन्ना भोयर यांच्या घरासमोरील अंगणात ठेवले होते. दिनांक ११ जून २०२६ रोजी तोंडाला दुप्पटा (रुमाल) बांधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी हे संपूर्ण साहित्य चोरून नेले. फिर्यादी गणेश मिसार यांच्या तोंडी रिपोर्टवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१९/२०२६, कलम ३०३ (२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश गजबे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे नान्होरी येथील संशयीत इसम राकेश ऊर्फ गोलु देवराम भोयर याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत कसून विचारपूस केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या राकेशने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या इतर दोन साथीदारांची नावे उघड केली.
राकेशने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याचे इतर दोन साथीदार यात मयुर ऊर्फ गोलु गोकुलदास शेंडे (वय २५ वर्षे, रा. नान्होरी, ता. ब्रम्हपुरी आणि विजयकुमार अशोक मेडपल्लीवार (वय ३८ वर्षे, रा. सिंगापूर, पोस्ट कवठी, ता. सावली, जि. चंद्रपूर) यांना तात्काळ अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीचा माल वाहून नेण्यासाठी आरोपींनी वापरलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. यामध्ये:
टाटा एस (छोटा हत्ती) क्रमांक MH 34 BZ 0017(किंमत अंदाजे ३,००,०००/- रुपये) आणि हिरो डिलक्स मोटारसायकल क्रमांक MH 34 BY 9508 (किंमत अंदाजे ४०,०००/- रुपये) असा एकूण ३,४०,००० रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली वाहने म्हणून जप्त करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी आणि कौतुकास्पद कामगिरी चंद्रपूरचे मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (ब्रम्हपुरी) दिनकर ठोसरे, आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हा उघडकीस आणण्यात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे (DB Team) सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे (बकल नं. २५५२), पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.