अवैध देशी दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
   

ब्रम्हपुरी:-
           ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गांगलवाडी मार्गे पाथरीकडे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा कुडेसावली येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, एक आरोपी फरार झाला आहे.
        दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कुडेसावली परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी त्यांच्या ताब्यातील फोर्ड फिगो कार क्रमांक एम.एच. 31 बीके 9242 मधून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण ४० पेट्या, त्यामध्ये ४ हजार सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४ लाख रुपये किमतीची कार देखील पोलिसांनी जप्त केली. अशाप्रकारे या कारवाईत एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
          या प्रकरणी सुनिल रमेश नरुले आणि विपुल तानाबा मेश्राम, दोघेही रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हरभजनसिंग सतनामसिंग, रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी हा फरार आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ७०१/२६, कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निंबोरकर, जयंत चुनारकर, संतोष येलपुलवार, सुनील आत्राम, अजित शेंडे आणि गजानन मडावी यांनी केली.

  Post Views:   726


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी