ब्रम्हपुरीच्या 'नेवजाबाई हितकारिणी' महाविद्यालयाचा १२ वी निकालात डंका; भक्ती राठी तालुक्यात प्रथम

   

ब्रम्हपुरी / प्रतिनिधी :
पूर्व विदर्भाचे 'शिक्षणाचे माहेरघर' अशी ओळख असलेल्या ब्रम्हपुरी नगरीतील नामांकित नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाने इयत्ता १२ वीच्या निकालात पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या निकालात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत तालुक्याच्या गुणवत्ता यादीत वरचे स्थान पटकावले आहे.
महाविद्यालयाच्या यशाची पताका फडकवत वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी भक्ती संदिप राठी हिने ९३ टक्के गुण प्राप्त करून ब्रम्हपुरी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केवळ वाणिज्यच नव्हे, तर विज्ञान विभागातही विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. साहिल बबन कोलते (विज्ञान विभाग) ९१.५०% गुण मिळवून तालुक्यात द्वितीय, अनम अदिब खान (वाणिज्य विभाग) ९०.८३% गुणांसह तालुक्यात तृतीय, धनश्री विजय पारधी: ९०% गुण मिळवून तालुक्यात चतुर्थ स्थान प्राप्त केले. 
नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेने नेहमीच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि शिस्तप्रिय वातावरण देण्यावर भर दिला आहे. या निकालातून संस्थेची शैक्षणिक परंपरा आणि प्राध्यापकांचे कठोर परिश्रम अधोरेखित झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या ध्येयामुळेच आज या महाविद्यालयाचे विद्यार्थी गगनभरारी घेत आहेत.  नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचा शाखा निहाय निकाल : विज्ञान शाखा ९९.३४%  , वाणिज्य शाखा ९८.८२% , कला शाखा ९४.७६% व एम.सी.व्ही.सी. ८६.७९% असा आहे.  विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलताबाई भैया आणि सचिव अशोक भैया यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, पर्यवेक्षक आनंद भोयर, प्रा. मेजर विनोद नरड यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे सातत्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही, हेच या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण ब्रम्हपुरी परिसरात आणि विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  Post Views:   2505


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी