वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
ब्रम्हपुरी :-ब्रम्हपुरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मानव वन्यजीव संघर्षामध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले, तर काहींना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष ही नित्याचीच बाब झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपूरी येथील एक गुराखी वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना 31 जुलै 2025 ला दुपारी एक वाजता उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपूरी येथील रहिवासी जयपाल लक्ष्मण उईके वय 42 वर्ष हे नवेगाव येथे गुराखी आहेत. गुरे ढोरे घेऊन चारावयास नेणे हा त्यांचा नित्यक्रम. ते नियत वनक्षेत्र लगतच्या रामपुरी जंगल शिवारात कक्ष क्रमांक 154 येथील नाला परिसरात गुरे राखत असताना, अचानक एका मोठ्या घनदाट झुडपात दबा धरून बसलेल्या मोठ्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक वाघाने केलेल्या हल्ल्यात जयपाल लक्ष्मण उईके हे गंभीर जखमी झाले. या आधी दोन वर्षा पूर्वी याच रामपुरी जंगल शिवारात एका इसमावर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. नशीब बळवंत म्हणून या हल्ल्यातून ते वाचले. परंतु, काही प्रमाणात जखमा होत्या. जयपाल उईके यांना उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी जयपाल उइके यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून, पाटीला, हाताला डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापतीमुळे जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी नरड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.