घरात चालत होता प्रतिबंधित तंबाखूचा काळाबाजार! ब्रम्हपुरी पोलिसांनी छापा टाकून हुक्का शिशाचा साठा केला जप्त; आरोपी फरार!
ब्रम्हपुरी:
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखू व अन्नपदार्थांच्या छुप्या विक्री आणि साठवणुकीविरुद्ध ब्रम्हपुरी पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. गुप्त माहितीच्या आधारे मौजा रूई येथील एका घरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल ४६,३९५ रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी भानुदास मारोती चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निलेश तुमसरे, स.पो.नि. मनोज खडसे व त्यांचे पथक पो.अं. प्रविण भिवगडे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार, वशिष्ट रंगारी आणि म.पो.अं. चित्ररेखा हे हद्दीत अवैध दारू, जुगार व सुगंधी तंबाखू विरोधात पेट्रोलींग करत होते. दरम्यान, मौजा रूई येथील भानुदास चौधरी याने आपल्या घरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी साठवणूक केली असल्याची खात्रीशीर माहिती खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांच्या पथकाने तातडीने दोन पंचांना सोबत घेऊन रूई गावाकडे कूच केली.
पोलीस पथक गावात पोहोचले असता, स्थानिक रहिवासी मयुर नागमोती याच्या मदतीने संशयित आरोपी भानुदास चौधरी याचे घर शोधण्यात आले. पोलिसांनी घराबाहेरून आवाज दिला असता भानुदास घरी नसल्याचे सांगण्यात आले. पथकाने पंचांसह घरात प्रवेश केला असता तेथे आरोपीचे वयोवृद्ध आई-वडील मारोती हरी चौधरी (वय ७७ वर्षे) व सुनिता मारोती चौधरी (वय ७० वर्षे) मिळून आले. त्यांना पोलिसांचा परिचय देऊन घराची कायदेशीर झडती घेतली असता, घरातील स्टोअर रूममध्ये ४ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये लपवून ठेवलेला होला हुक्का शिशा तंबाखू १५ मोठे पॅकेट्स (७५ छोटे पाऊच), एकूण किंमत १९,८७५/- रुपये, मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू ४ बॉक्सेस (४० टीन डब्बे), एकूण किंमत ११,४००/- रुपये, ईगल हुक्का शिशा तंबाखू (४० ग्रॅम) ९ पॅकेट्स (९० छोटे पाऊच), एकूण किंमत ७,६५०/- रुपये, ईगल हुक्का शिशा तंबाखू (२०० ग्रॅम) १८ पॅकेट्स, एकूण किंमत ७,४७०/- रुपये असा एकूण जप्त मुद्देमाल ४६,३९५/- रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
या प्रतिबंधित साठ्याबाबत विचारणा केली असता, आरोपीच्या आई-वडिलांनी "आम्ही वयोवृद्ध असून घरीच राहतो, हा माल आमचा मुलगा भानुदास याचाच असून या व्यवहाराबाबत आम्हाला काहीही माहिती नाही," अशी कबुली पंचांसमक्ष दिली. स.पो.नि. मनोज खडसे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संपूर्ण माल जप्त केला. केमिकल अनॅलिसिस (C.A. Testing) साठी जप्त साठ्यातून ४ वेगवेगळ्या प्रकारांचे सॅम्पल घटनास्थळी सीलबंद करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची साठवणूक व विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकर्णी पो.अं. निलेश तुमसरे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आरोपी भानुदास मारोती चौधरी (रा. रूई) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS)-२०२३ चे कलम २२३, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a), ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या आरोपी भानुदास चौधरी फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध आणि प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.