थकबाकी न भरता महावितरणची वीजचोरी! पथकाची धाड, मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

   

 ब्रम्हपुरी :
        वीज बिल थकल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला, तरीही एका महाशयांनी बिल भरण्याचे नाव घेतले नाही. उलट थेट मिटरमध्येच फेरफार करून अनधिकृतपणे वीज वापरणे सुरू ठेवले. पण हा प्रकार जास्त दिवस टिकला नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीत हा सर्व प्रकार उघडीकीस आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाकडे मागील महिन्याची सुमारे २,३२० रुपयांची वीज बिल थकबाकी होती. बिल न भरल्यामुळे महावितरणच्या नियमानुसार त्यांचा वीज पुरवठा आधीच खंडित करण्यात आला होता. तरीही बिल का भरले गेले नाही, हे तपासण्यासाठी महावितरणच्या पथकाने गुरुवारी दुपारी अचानक संबंधित ठिकाणी भेट दिली आणि पाहणी सुरू केली. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना तिथे मोठा गैरप्रकार आढळून आला. ग्राहकाने मिटरच्या 'टर्मिनल'मधील आउटगोइंग वायर काढून ती थेट इन्कमिंग टर्मिनलला जोडली होती. अशा प्रकारे महावितरणची दिशाभूल करत अनधिकृतपणे वीज वापरली जात होती. महावितरणच्या अंदाजानुसार, या फेरफारीद्वारे एकूण १११ युनिटची म्हणजेच सुमारे ७०९ रुपयांची वीजचोरी करण्यात आली आहे. या चोरीची तडजोड रक्कम दोन हजार रुपये इतकी आकारण्यात आली आहे.
         याप्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. महावितरणच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ आणि १३८ अन्वये वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा, चोरीसाठी वापरलेले साहित्य, तपासणी अहवाल आणि छायाचित्रे असा सर्व पुरावा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे. थकबाकी न भरता परस्पर वीज वापरणाऱ्या इतर ग्राहकांचेही धाबे यामुळे चांगलेच दणाणले आहेत.

  Post Views:   832


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी