ब्रम्हपुरी तालुक्यात केबल चोरांचा उच्छाद;

हळदा आणि निलज शिवारातून ४.८० लाखांच्या तांब्याच्या तारा लंपास दोन दिवसांत २६ शेतकऱ्यांना बसला फटका;
   

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :
 तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर असलेल्या शेतशिवारात सध्या केबल चोरांनी धुमाकूळ घातला असून, हळदा आणि निलज या दोन गावांतील तब्बल २६ शेतकऱ्यांच्या सिंचन पंपांच्या १२,००० फूट तांब्याच्या तारा (केबल) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या दोन मोठ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून ऐन उन्हाळी धान पिकाच्या हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
 हळदा येथील वैनगंगा नदीघाटावर १२ फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी पहिला हात साफ केला. शेतकरी अरुण आत्माराम भोयर (वय ५०) यांच्यासह गावातील १३ शेतकऱ्यांच्या मोटर पंप ते स्टार्टरपर्यंतच्या तारा कटरने कापून नेण्यात आल्या. यात अरुण भोयर, पंकेश हुलके, बालाजी भोपये (प्रत्येकी ७०० फूट), देविदास चापले, मुखरु रोहनकर (प्रत्येकी ८५० फूट), गोवर्धन मोरांडे, राहुल राऊत, होनाजी निंब्रड, बालाजी राऊत (प्रत्येकी ६०० फूट), यशवंत राऊत, होनाजी राऊत, वृंदावन राऊत (प्रत्येकी ५०० फूट) आणि पांडुरंग माथनकर (४०० फूट) या शेतकऱ्यांचा समावेश आहे. अज्ञात चोरट्यांनी एकूण ८,१०० फूट तांबा वायर अंदाजे किंमत ३.२४ लाख रुपयेचा मुद्देमाल लंपास केला आहे. 
      हळदा येथील घटनेची शाई वाळते न वाळते तोच, १३ फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील निलज शिवाराकडे वळवला. येथील सुरेश लोकनाथ पिल्लारे (वय ३६) यांच्यासह अन्य १२ शेतकऱ्यांच्या प्रत्येकी ३०० फूट तारा चोरीला गेल्या. यात सुरेश पिल्लारे, विनोद चौधरी, विनायक ढोरे, हेमराज भुते, एकनाथ भर्रे, दुर्गेश भर्रे, योगराज पिल्लारे, मनोज पिल्लारे, दशरथ चौधरी, शंकर भुते, दशरथ राऊत, कार्तिक भुते आणि श्रीराम डाहाके या शेतकऱ्यांचा समावेश आहे. अज्ञात चोरट्यांनी एकूण ३,९०० फूट तांबा वायर अंदाजे किंमत १.५६ लाख रुपयेचा मुद्देमाल लंपास केला आहे. 
        दोन्ही ठिकाणच्या घटनांमध्ये साम्य असे की, उन्हाळी धानाची रोवणी सुरू असल्याने शेतकरी दिवसभर पंप सुरू ठेवतात. मात्र, संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शेतकरी घरी परतताच चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने नियोजनबद्धरीत्या या तारा चोरल्या आहेत. तांब्याचा भाव प्रति फूट ४० रुपये गृहीत धरता, चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे.या दोन्ही प्रकरणांत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन हंगामात सिंचन व्यवस्था कोलमडल्याने "आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे," अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सलग होणाऱ्या या चोऱ्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी हळदा व निलज येथील ग्रामस्थांनी केली आहे.

  Post Views:   745




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी