ब्रह्मपुरीत काळाचा घाला: भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत ९ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू
ब्रह्मपुरी / प्रतिनिधी :
तालुक्यातील चौगान परिसरात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. भरधाव आणि निष्काळजीपणे चालवल्या जाणाऱ्या एका विनानंबर ट्रॅक्टरने सायकलवरून जाणाऱ्या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे मागील चाक अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चौगान गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ब्रम्हपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौगान येथील रहिवासी सुभाष पांडुरंग ननावरे (वय ४५) यांची चुलत पुतणी आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सायकलने डांबरी रस्त्यावरून जात होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चौगान डांबरी रोडवर समोरून स्वराज ७३५ कंपनीचे एक विनानंबर ट्रॅक्टर अत्यंत वेगाने येत होते. ट्रॅक्टरचालक दिगांबर शंकर मैंद (वय ३९, रा. चौगान) याने समोरून सायकलवर येणाऱ्या लहान मुलीला पाहूनही आपल्या वाहनाचा वेग कमी केला नाही. ट्रॅक्टर अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे सायकलस्वार मुलगी थेट ट्रॅक्टरला जाऊन धडकली.
हा अपघात इतका भीषण होता की, मुलगी ट्रॅक्टरखाली आल्यानंतर तिच्या डोक्याला ट्रॅक्टरच्या मागील चाकाच्या ग्रीफचा जोरदार मार लागला. यात ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एका हसत्या-खेळत्या चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने ननावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी फिर्यादी सुभाष ननावरे यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आपबीती सांगत तक्रार नोंदवली. त्यांच्या तोंडी रिपोर्ट आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टरचालक दिगांबर मैंद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेची नोंद घेऊन पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली आहेत. घटनेचा पुढील सविस्तर तपास ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार होमराज खोब्रागडे करत आहेत.