गोवंश तस्करीचा पर्दाफाश; २ वाहनांसह २० जनावरे जप्त, ४ आरोपींना अटक

   

ब्रम्हपुरी:
     स्थानिक पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीवर एक मोठी आणि यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. गांगलवाडी-एकारा मार्गे होणारी अवैध जनावरांची वाहतूक रोखून पोलिसांनी तब्बल ९ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गांगलवाडी-एकारा मार्गावरून गोवंशीय जनावरांची अवैध तस्करी केली जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलत पंचांसमक्ष या मार्गावर सापळा रचला. संशयास्पद वाटणारे ट्रक क्रमांक MH 49 AT 8332 आणि ट्रक क्रमांक MH 27 DT 1542 यांना पोलिसांनी थांबवून त्यांची तपासणी केली.पोलिसांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, त्यात अत्यंत धक्कादायक आणि क्रूर प्रकार उघडकीस आला. दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण २० गोवंशीय जनावरे अतिशय दाटीवाटीने कोंबलेली होती. त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, तसेच त्यांना दोरीने निर्दयपणे बांधून ठेवण्यात आले होते. चालकांकडे वाहतूक परवाना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तपासणी प्रमाणपत्र विचारले असता, त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. यावरून हा गोवंश तस्करीचा अवैध प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन्ही वाहने आणि २० गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली आहेत. या जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजे किंमत रु. ९,४५,०००/- (नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये) इतकी आहे.
           पोलिसांनी घटनास्थळावरून भूषण तिरुपती जम्पलवार (वय ३२, रा. घुटकाळा तलाव, चंद्रपूर), गणेश रमेश गोहणे (वय २८, रा. चिखली, ता. मूल, जि. चंद्रपूर), अमित पुणेश्वर कोवे (वय १९, रा. चिखली, ता. मूल, जि. चंद्रपूर), विकास तुळशीराम कळसकर (वय २१, रा. चिखली, ता. मूल, जि. चंद्रपूर) या ४ आरोपींना ताब्यात घेतले असून, यांच्यासह अकील कुरेशी (वय ४५, रा. बिनबा गेट, चंद्रपूर), रुपेश माहुरे (वय २५, रा. नवेगाव खुर्द, ता. ब्रम्हपुरी) व धनराज माहुरे (वय ४५, रा. नवेगाव खुर्द, ता. ब्रम्हपुरी) असे एकुण ०७ जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 
         ही धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत ब्रम्हपुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोविंदराव चव्हाण, पोलीस हवादार अरुण पिसे, रतन लेनगुरे, मिलिंद नैताम, पोलीस शिपाई अमोल लोनबले आणि शुभम लेडांगे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

  Post Views:   776


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी