ब्रम्हपुरीत रक्ताळलेली सावकारी!

१७ लाखांच्या बदल्यात उकळले ३० लाख; शेतकऱ्याला मारहाण करून शेती अन् ट्रॅक्टरही हडपले
   

ब्रम्हपुरी:
कर्जाचा डोंगर आणि खासगी सावकाराचा अमानवीय जाच... या दुहेरी संकटात सापडलेल्या ब्रम्हपुरीतील शेतकऱ्यांची अक्षरशः दैना झाली आहे. कुख्यात सावकार लक्ष्मण पुंडलिक उरकुडे याच्या दहशतीखाली अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले असून, १७ लाखांच्या बदल्यात ३० लाख रुपये उकळूनही शेतकऱ्याला बेदम मारहाण करून त्याची वडिलोपार्जित शेती हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी उरकुडेविरुद्ध अपहरण, खंडणी आणि अवैध सावकारीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
१७ लाखांचे झाले ३० लाख; तरीही मिळाली मरणयातना
            भालेश्वर येथील विजय रमेश भागडकर यांनी २०१७ मध्ये ट्रॅक्टरचे हप्ते भरण्यासाठी उरकुडेकडून १० टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते. व्याजाच्या हमीसाठी उरकुडेने त्यांची ०.७५ हेक्टर शेती स्वतःच्या ताब्यात घेतली. २०१७ ते २०२१ या काळात भागडकर यांनी एकूण १७.३५ लाख रुपये कर्ज घेतले. या बदल्यात त्यांनी व्याजासह तब्बल २९.५४ लाख रुपये परत केले. पैसे देण्यास उशीर झाल्यावर उरकुडेने भागडकर यांचे अपहरण करून त्यांना अहेरनवरगाव रोडवरील पुलावर नेऊन बेदम मारहाण केली. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा भागडकर आपली उरलेली शेती विकण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. तिथेही उरकुडेने त्यांना सर्वांसमोर मारहाण केली आणि जमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे खरेदीदाराकडून स्वतःच हिसकावून घेतले. या चक्रव्यूहात भागडकर यांना आपली सर्व शेती आणि घरातील तीन ट्रॅक्टर गमवावे लागले. 
                 दुसऱ्या घटनेत, चकबोथली येथील विनोद केवळराम मैंद या शेतकऱ्याचीही अशीच फसवणूक झाली. ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी उरकुडेकडून २ लाख रुपये घेतले होते. उरकुडेने दरमहा १० टक्के व्याज आणि दोन महिन्यांत परतफेड न केल्यास २० टक्के (दुप्पट) व्याज आकारण्याची जाचक अट घातली होती. मैंद यांनी दोन महिन्यांत मुद्दलासह २ लाख ४२ हजार रुपये परत केले, मात्र तरीही आपली मोठी आर्थिक पिळवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. १६ डिसेंबर २०२५ रोजी उरकुडेवर इतर सावकारी गुन्हे दाखल झाल्याचे समजताच, या दोन्ही पीडित शेतकऱ्यांनी धीर एकवटून पोलीस ठाणे गाठले.
         पोलिसांनी लक्ष्मण उरकुडे विरुद्ध भारतीय दंड संहिता  ३२३, ३६४-अ , ३८४, ३८७ , ५०४, ५०६ , महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ आणि ४४. कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. ब्रम्हपुरी परिसरात अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या इतर पीडितांनीही न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  Post Views:   257




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी