५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांचा कारावास

   

ब्रह्मपुरी :
               पाच वर्षांच्या लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि ५ हजार रुपये दंडाची ठोकळ शिक्षा सुनावली आहे. अवघ्या दोन वर्षांत न्यायालयाने हा निकाल देऊन पीडित चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळवून दिला.
             ही धक्कादायक घटना घडली होती २७ ऑगस्ट २०२२ रोजी. ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील गुरुकुंज आश्रम देवस्थान परिसरात सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास ही चिमुकली खेळत होती. त्याच वेळी गावातीलच युवराज बळीराम मेश्राम (वय ३०) याने संधी साधून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. बालिका वेदनेने जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकून तिच्या घरातील लोक धावत आले. ते येताच आरोपी युवराज तिथून पळून गेला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी अजिबात वेळ न दवडता थेट ब्रह्मपुरी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवून गुन्हा नोंदवला (अपराध क्र. ४३७/२०२२) आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
          ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर यांनी या प्रकरणाचा अत्यंत सखोल आणि संवेदनशीलतेने तपास केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि इतर भक्कम परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला चंद्रपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. सुधाकर डेगावार यांनी बाजू मांडली. त्यांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांच्या गवाही आणि युक्तिवाद न्यायाधीशांनी ग्राह्य धरला. सर्व पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी युवराज मेश्राम याला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड अशी कडक शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल. तसेच दंडाची संपूर्ण ५,००० रुपयांची रक्कम पीडित बालिकेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
           या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रकाश नागोराव शेंदरे यांनी काम पाहिले.चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. पोलिसांचा वेळेत झालेला तपास आणि न्यायालयात मांडलेली मजबूत बाजू यामुळेच पीडित बालिकेला वेळेत न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.

  Post Views:   994


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी