वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार

   

ब्रम्हपुरी
      ब्रम्हपुरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मानव वन्यजीव संघर्षामध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले, तर काहींना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष ही नित्याचीच बाब झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली येथील एक शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ११ ऑगस्ट २०२५ ला सकाळी ११.३० वाजता दरम्यान घडली आहे. सदर घटना सायंकाळी ५ वाजता दरम्यान उघडकीस आली. 
    प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली येथील रहिवासी घनश्याम गोविंदा उंदीरवाडे वय ५१ वर्ष हे पद्मापूर बीट परिसरात बल्लारपूर येथे त्यांची शेती आहे. उंदीरवाडे हे आपल्या शेतात गट क्रमांक ७२ येथे नेहमीप्रमाणे कामा करिता गेले होते. मात्र सायंकाळ होऊन परत आले नाही. शेतातून घनश्याम उंदीरवाडे परत न आल्याने त्याचा शोध गावकरी व वन विभाग कर्मचाऱ्यांच्या वतीने घेण्यात आला. त्यावेळी त्यांचं मृतदेह शेत शिवारा पासून १०० मीटर अंतरावर दिसून आला. वन्य प्राण्यांने त्यांच्यावर सकाळी ११ वाजता च्या सुमारास अचानक हल्ला चढविला. वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात घनश्याम गोविंदा उंदीरवाडे हे ठार झाले. सदर घटना दक्षिण वनपरिक्षेत्रात घडली आहे. मृतदेह मिळताच पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविला. दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी सोडवले यांनी मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजारांची आर्थिक मदत केली. तसेच इतर मदत लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. वन विभागाच्या वतीने सदर परिसरात वन्य प्राण्यांवर पाळत ठेवण्यासाठी कॅमेरे ट्रॅप लावण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी सोंडवले यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. काही दिवसांपूर्वी पूर्वी रामपुरी जंगल शिवारात वाघाने हल्ला करून गुराख्याला जखमी केल्याची घटना घडली होती, हे विशेष. सदर मानव वन्य प्राणी संघर्ष समस्या सोडविण्यासाठी वन विभागाने पावले उचलण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.

  Post Views:   536




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी