वादळ व गारपीटीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान
ब्रम्हपुरी/का.प्र.
रविवार व सोमवार या दोन दिवस झालेल्या वादळ, गारासह पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच परिसरातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दि.२७ व २८ एप्रिलला सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर, अर्हेरनवरगांव, पिंपळगांव (भोसले )येथे वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर अनेक झाडे पडून काही तास वाहतूक ठप्प झाली . तसेच आलेल्या तुफानी वादळामुळे उन्हाळी धान पिक भूईसपाट झाले. यामुळे शेतकर्यांच्या तोंडचे धान पीक निसर्गाने हिरावून नेले आणि त्यांचे कंबरडे मोडले. सोबतच परिसरातील आंबे, चिक्कु व अनेक फळझाडांची पडझड झाल्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.