बेरोजगारीवर मात करीत डोर्लीच्या "प्रवेश"ची मेकॅनिक व्यवसायात भरारी

संसाराच्या गाडीला गॅरेजचा आधार; बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी
   


ब्रम्हपुरी/का.प्र.
हारण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह केला नाही पण नशिबात असेल मिळेल म्हणूनही अपेक्षा न बाळगता प्रयत्न आणि मेहनत करणे सोडले नाही. याच मंत्राची गाठ बांधुन बेरोजगारीवर मात करीत उभारला ट्रक्टर गॅरेजचा व्यवसाय. 
ब्रम्हपुरी तालुक्यात दक्षिणेस दुर्गम जंगलव्याप्त भागात डोर्ली गावं आहे. वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या या गावाची जेमतेम ६० घरांची वस्ती. गावाची लोकसंख्या अंदाजे ४०० आहे. याच गावातील गिरिधर ठाकरे व इंदुबाई ठाकरे या आईवडीलांच्या पोटी प्रवेश हा सन १९९२ मध्ये जन्माला आला. घरची परिस्थिती बेताचीच अशा परिस्थितीत प्रवेशचे प्राथमिक शिक्षण डोर्ली गावातच झाले तर माध्यमिक शिक्षण आवळगांव येथे झाले. यानंतर १२वी पर्यंतचे शिक्षण गांगलवाडी येथे पुर्ण केले व नंतर आयटीआय यामध्ये ड्रायव्हर कम मेकॅनिक हा कोर्स आरमोरी, गडचिरोली येथुन पुर्ण केला. आयटीआय कोर्स पुर्ण केल्यानंतर प्रवेशने आरमोरी व ब्रम्हपुरी येथील अनेक मोटर गॅरेजमध्ये काम केले. येथे काम करीत असताना विना मोबदला प्रवेशने कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर प्रवेशने आपल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर सन २०१४ मध्ये गांगलवाडी येथे श्री मोटर गॅरेजची मुहुर्तमेढ रोवली. 
मृदभाषी, कामात तत्परता, गुणवत्तापूर्ण काम या अनेक गोष्टींनी प्रवेशने टॅक्टर मालकांच्या मनात "प्रवेश" केला. त्यामुळे खर्‍या अर्थाने प्रवेशच्या जीवनात यशाने प्रवेश करून प्रवेशची आर्थिक बाजु सावरली. सध्याच्या परिस्थितीत प्रवेशच्या गॅरेजमध्ये ३० ते ३५ किमी अंतरावरील टॅक्टर मालक आपली टॅक्टर दुरूस्तीसाठी याच गॅरेजला प्राधान्य देतात. त्यामुळे बेरोजगारीवर मात करीत प्रवेश या व्यवसायात प्रवेश करून आर्थिक नफा मिळवीत लोकांना गॅरेजमध्ये व घरपोच सेवा देत आहे.

  Post Views:   53



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी