सावंगी येथील विनय बुल्ले याची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड

   

देसाईगंज 
      जिल्हा क्रीडा प्रशिक्षण संघ गडचिरोली व विद्याभारती ज्युनियर कॉलेज आंबेशिवनी जिल्हा गडचिरोली येथील इयत्ता १२ वी चा विद्यार्थी विनय प्रभाकर बुल्ले याची मध्य प्रदेश (गदरवाडा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाच्या १९ वर्षाखालील गटात निवड करण्यात आली.
       विनय प्रभाकर बुल्ले हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील सावंगी या गावाचा रहिवासी आहे. विनय चे वडील प्रभाकर बुल्ले हे शासकीय तांत्रिक विद्यालय गडचिरोली (आयटीआय) येथे मुख्य लिपिक पदावर कार्यरत असल्यामुळे गडचिरोली येथे त्यांचे कुटुंबीय सद्यस्थित वास्तव्यास आहेत. विनय ला लहानपणापासूनच व्हॉलीबॉल खेळाची आवड असल्यामुळे, त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण संघ गडचिरोली येथे विनयने या खेळाचे प्रशिक्षण घेतले. विनयने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने व्हॉलीबॉल खेळाचा सराव नेहमीच चालू ठेवला. शासकीय तसेच खाजगी भरविल्या जाणाऱ्या हॉलीबॉल स्पर्धेत आपल्या चमुशी हिरीरीने सहभागी होत अनेक खेळ जिंकले. व्हॉलीबॉल स्पर्धेत विनय लिफ्टर म्हणून आपली भूमिका प्रभावीपणे बजावतो. गडचिरोली येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय (विभागीय) व्हॉलीबॉल स्पर्धेत लिफ्टर म्हणून अंडर १९ गटात त्याची निवड झाली. तद्नंतर गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील तालुका क्रीडा संकुल येथे दिनांक ०३ व ०४ नोव्हेंबर २०२५ ला पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत त्याची सलग दोन दिवस चाचणी घेण्यात आली. त्यात त्याने १९ वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत लिप्टर म्हणून चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात त्याची निवड करण्यात आली. मध्य प्रदेश गदर वाडा येथे दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरता विनय महाराष्ट्र राज्य संघात लिफ्टर म्हणून खेळणार आहे. यासाठी विनय बुल्ले हा अकोला येथे व्हॉलीबॉल स्पर्धेची पूर्वतयारी करण्याकरिता कॅम्पला जाणार आहे. 
      विनय बुल्ले याची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा प्रशिक्षण संघ गडचिरोली, स्पंदन फाउंडेशन गडचिरोली, विद्याभारती जुनिअर कॉलेज आंबेशिवनी, जिल्हा गडचिरोली, व माधवजी बुल्ले गुरुजी, वडील प्रभाकर बुल्ले, आई प्रगती बुल्ले, भाऊ, ताई तसेच बुल्ले कुटुंबीय सावंगी यांनी अभिनंदन केले आहे. विनय बुल्ले यांनी आपल्या निवडीचे श्रेय आई, वडील व सर्व गुरुजन यांना दिले आहे.

  Post Views:   151




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी