नगराध्यक्ष पदासाठी अनेक राजकीय पक्षातील दिग्गजांच्या नावांची चर्चा

   

ब्रम्हपुरी / महेश पिलारे 
              राजकीय पक्षांना व जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले होते. अशातच ब्रह्मपुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गा करीता आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षातील हौसे, गौसे, नऊसे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने राजकीय पक्षातील अनेक दिग्गज ओबीसी उमेदवार या पदासाठी आपला दावा करीत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात इच्छुकांची भाऊक गर्दी वाढली आहे. काँग्रेस, भाजपा, यांच्यासह इतर पक्षातील नगराध्यक्ष पदासाठी दावा करणार्‍या उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
          ब्रह्मपुरी नगरपालिकेवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासक राज होते. ब्रम्हपुरी नगरपालिकेचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. ब्रम्हपुरी नगर पालिकेत नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गाकरीता राखीव असल्याने या पदासाठी राजकीय पक्षातील अनेक ओबीसी नेत्यांची नावे समोर आली आहेत. काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगरसेवक नितीन उराडे, प्रतिष्ठित व्यापारी तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश मिसार, प्राचार्य देविदास जगनाडे यांच्या नावाची चर्चा आहे. 
          तर भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक मनोज भूपाल, भाजपा तालुका महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज वठे, माजी नगरसेवक विलास विखार, भाजपा शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, भाजपा माजी शहराध्यक्ष अरविंद नंदूरकर यांच्या नावाची चर्चा आहे. 
          तसेच शिवसेना पक्षाकडून नरू नरड हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करीता दावा करीत आहेत. काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राजकीय पक्षातील मातब्बर नेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आपलीच निवड होणार असल्याचा दावा केला आहे. 
       राजकीय पक्षातील अनेक प्रतिष्ठित मातब्बर उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने नगराध्यक्ष पदासाठी सक्षम व योग्य उमेदवाराची निवड करण्याचा ताप राजकीय पक्षातील पक्षश्रेष्ठींना होणार आहे, हे मात्र नक्की. असे असले तरी, अधिकृत उमेदवारांची घोषणा व्हायला अजून बराच वेळ असला, तरी संभाव्य उमेदवारांची चाचपणी पक्षाकडून सुरू झाली आहे. काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे. उमेदवार निवडीचे सर्वाधिकार विधीमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे राहणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार निवडीचे सर्वाधिकार माजी आमदार अतुल देशकर यांच्याकडे राहणार असल्याचे कळते. साम, दाम, दंड, भेद वापरून ताकदीणीशी लढणारा उमेदवारच नगराध्यक्ष पदासाठी योग्य असल्याने त्यावर राजकीय पक्षाचे विचारमंथन सुरू आहे, तूर्तास एवढेच.

  Post Views:   1218




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी