पित्याचा विरह सहन न झाल्याने २४ तासांतच पोटच्या गोळ्यानेही सोडला प्राण

ब्रह्मपुरीतील हृदयद्रावक घटनेने शहर सुन्न
   

ब्रम्हपुरी/ महेश पिलारे :
           अथक परिश्रमाने लेकरांना आपल्या पायावर उभे करणाऱ्या एका हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने असा घाला घातला आहे, ज्याने संपूर्ण ब्रह्मपुरी शहराचे मन सुन्न झाले आहे. आईची प्रकृती खालावली, आई अंथरुणावर खितपत पडली आहे म्हणून मुलगा तिला पाहण्यासाठी आला, परंतु दोन दिवसांतच त्याचे अचानक निधन झाले. वडिलांच्या अंतिमविधीचा कार्यक्रम पार पडण्यापूर्वीच, संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालेले असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि वडिलांच्या पाठोपाठ मुलानेही जगाचा हा निरोप घेतला. हा हृदयद्रावक प्रसंग ब्रह्मपुरी शहरातील बोंडगाव वार्ड येथे घडला. नामदेव पंढरी तूपट (वय ७० वर्षे) आणि तुळशीदास नामदेव तूपट (वय ४२ वर्षे) अशी वडील व मुलाची नावे आहेत.
              ब्रह्मपुरी शहरातील बोंडगाव वार्ड येथील रहिवासी नामदेव पंढरी तूपट यांना कोमल व तुळशीदास ही दोन मुले आहेत. त्यांनी शेतात राबराब राबून दोघांनाही स्वतःच्या पायावर उभे केले. कोमल हा मोठा मुलगा गावातच राहून शेती व मजुरी करतो. तर तुळशीदास हा लहान असून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे, तर त्याची पत्नीसुद्धा धामणी (जिल्हा अमरावती) येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सुखी संसार सुरू असून त्यांना एक मुलगा आहे.
             काही दिवसांपूर्वी तुळशीदास यांना आपल्या आईची प्रकृती बरी नसून ती अंथरुणाला खिळली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच बोंडगाव येथील आपले घर गाठत आई व कुटुंबीयांची भेट घेतली. आपल्या आईची ममतेच्या वात्सल्याने विचारपूस केली आणि राहत्या घरी दोन दिवस मुक्काम केला. दोन दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर अचानक सकाळी ७:३० वाजता नामदेव पंढरी तूपट यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाचे तीव्र दुःख झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले होते.
           बाप गेल्याचे दुःख उराशी असतानाच, वडिलांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार (मुखाग्नी) करण्यापूर्वीच सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास तुळशीदास यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी लगेच घरातील एका सहकाऱ्याला सोबत घेऊन ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालय गाठले. परंतु, नियतीला त्यांचे जगणे मान्य नव्हते; रुग्णालयातच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणातच तुळशीदास यांनी जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या पाठोपाठ मुलानेही प्राण सोडल्यामुळे संपूर्ण बोंडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पित्याला मुखाग्नी देण्यापूर्वीच आणि वडिलांच्या विरहाचे गाठोडे उराशी बाळगून अवघ्या चोवीस तासांतच मुलाने प्राण सोडल्यामुळे नियतीच्या या अथांग क्रौर्यानं संपूर्ण ब्रह्मपुरीच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. वडील जाण्याचा विरह आणि आघात सहन न झाल्यामुळेच मुलानेही प्राण त्यागल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू असून, एकाच घरातील या पिता-पुत्राच्या अकाली निधनामुळे संपूर्ण बोंडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पित्याच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता बोंडेगांव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर त्यांच्या मुलाच्या पार्थिवावर रात्री साडेआठवाजता अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  Post Views:   1406


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी