कोलारीवासियांची एसडीपीओ कार्यालयावर धडक

अमित तुपटेच्या संशयास्पद मृत्यूची चौकशीची मागणी
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या कोलारी गावातील शेतशिवारातील विहीरीत मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह गावातील अमित विश्वनाथ तुपटे याचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सदर प्रकाराला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले. मृतक अमित तुपटेच्या भावाला जीवे मारण्याची धमकी, शवविच्छेदन अहवालातील गुदमरून मृत्यू, विहीरीतील कमी पाण्याची पातळी, व संशयीत आरोपींचे अरेरावी पणांचे वागणे, पोलिस पाटलांची मृतकाच्या भावाला बयाण न देण्यासंदर्भातील धमकी यामुळे मृतक अमित तुपटेची आत्महत्या नसून हत्या केली आहे, असा आरोप नातेवाईकांनी पत्रपरिषदेत केला. नातेवाईकांनी मृतकाला न्याय मिळण्याचा पवित्रा उचलल्यानंतर गावातील शेकडो नागरिकांनी एसडीपीओ कार्यालयासमोर धडक देत मृतक अमित तुपटेच्या संशयास्पद मृत्युची चौकशी करण्याची मागणी उचलून धरली.

कोलारी येथील रहिवासी असलेला मृतक अमित विश्वनाथ तुपटे हा २८ फेब्रुवारी २०२५ पासून बेपत्ता झाला होता. दुसर्‍या दिवशी कुटूंबीयांकडून अमित बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. शेतशिवार, विहीरी, नदी व गावात सर्वत्र शोध घेतला असता, तो आढळून आला नाही. दि. ०६ मार्च २०२५ रोजी त्याचा मृतदेह गावातील शेतशिवारातील विहीरीत आढळून आला. मृतक अमितची आत्महत्या नसून प्रेमप्रकरणातून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मृतकाचा भाऊ राकेश विश्वनाथ तुपटे, गावच्या सरपंच कांचन सोमेश्वर तुपटे व सोमेश्वर तुपटे यांच्यासह इतर गावकरी तथा कुटूंबीयांनी पत्रपरिषदेत केला. मृतकाचे प्रेत ज्या विहीरीत सापडले, तेथील पाण्याची पातळी अगदी नगण्य होती, विहीरी लगतच्या शेतात गहू पिकाची खुदवड झालेली होती. घटनास्थळावर दुचाकीचे अवशेष पडलेले होते. विहीरी जवळील तणसीच्या ढिगार्‍यातून मृतदेह कुजल्याची दुर्गंधी येत होती. त्यामुळे मृतदेह तणसीच्या ढिगार्‍यात लपविले असावे, नंतर विहीरीत फेकले असावे, तसेच घटनास्थळ विहीरीजवळील तणसीचा ढिगारा पेटवून देण्यात आला, त्यामुळे मृतकाची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. सदर माहिती पोलिसांना कळवून देखील संशयाच्या आधारावर संशयीतांची साधी चौकशी करण्याचे धाडस पोलिसांनी दाखविले नसल्याचा आरोप कुटूंबीयांनी पत्रपरिषदेत केला. 
    मृतकाच्या भावाला गावातील तीन लोकांनी ११ व १४ मार्च रोजी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सोबतच पोलिस पाटील यांनी संशयीतांची घेतलेली बाजू व अन्यायग्रस्तांना वाचा बंद ठेवण्यासाठी दिलेली धमकी हे सुद्धा संशयाच्या भोवर्‍यात आहे. सदर प्रकरणात घातपात झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पूर्न शवविच्छेदन व निष्पक्ष चौकशी करून मृतकाच्या कुटूंबीयांना न्याय देण्याची मागणी मृतकाचे भाऊ राकेश विश्वनाथ तुपटे,सरपंच कांचन सोमेश्वर तुपटे व पती सोमेश्वर तुपटे यांनी पत्रकार परिषदेत केली. नातेवाईकांनी मृतकाला न्याय मिळण्याचा पवित्रा उचलल्यानंतर गावातील शेकडो नागरिकांनी एकत्र येत एसडीपीओ कार्यालयासमोर धडक देत मृतकाच्या संशयास्पद मृत्युच्या निष्पक्ष चौकशी करण्याची व पिडीत कुटूंबीयाला न्याय देण्याची मागणी उचलून धरली. यावेळी महिला पुरूषांची संख्या लक्षणीय होती.

  Post Views:   53



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी