शिक्षणनगरी की गुन्हेगारांचे अड्डे? ब्रम्हपुरीत विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात
दोन विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून लूटले
ब्रम्हपुरी/का.प्र.
दि. २१ मार्च रोजी ब्रम्हपुरी शहरातील बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासमोर एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या सातवीतील आणि नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना रस्त्यात अडवून, चाकूचा धाक दाखवत तीन युवकांनी त्यांच्याकडून खिशातील पैसे हिसकावून घेतले. विद्यार्थ्यांशी घडलेला हा प्रकार केवळ गंभीरच नव्हे तर शहरातील असुरक्षिततेचे भीषण चित्र अधोरेखित करणारा आहे.
नशेच्या विळख्यात अडकलेल्या या युवकांनी विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखविला आणि पैसे हिसकावून घेतले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, हे सुदैव असले तरी ब्रम्हपुरीत दिवसेंदिवस गांजेटी, नशेबाज आणि गुन्हेगारांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ब्रम्हपुरीसारख्या शिक्षण, आरोग्य आणि क्रीडानगरीच्या प्रतिमेला हा डाग असून अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘माझा मुलगा शाळेतून घरी सुरक्षित पोहोचेल का?' हा प्रश्न पालकांच्या मनात अस्वस्थपणे घर करून बसणारा आहे.
येथील हुतात्मा स्मारक परिसर, जिल्हा परिषद शाळा क्र. ४ परिसर, तसेच शहरातील अनेक भाग हे गांजेटींचे अड्डे झाले आहेत. रात्रंदिवस अनेक युवक खुलेआम गांजा ओढताना दिसतात. गांज्याच्या नशेत ते कोणतेही कृत्य करण्यास सक्षम असतात. चाकू दाखवून विद्यार्थ्यांकडून पैसे हिसकावण्याची ही घटना त्याचाच भयानक पुरावा आहे. अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेल्या ब्रम्हपुरीत दारू विक्री, सट्टा-पट्टी, जुगार, गांजासारखे पदार्थ विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. अनेक वेळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त रकमेचा आकडा अत्यल्प असतो. यामुळे संबंधितांवर संशय घेण्यास वाव मिळतो. अशा अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, त्यात अपयश आल्यास हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.
शहरात रस्त्यापासून गल्लीबोळांपर्यंत सुरू असलेल्या वाळू, मुरूम तस्करीमुळे या नागरी व्यवस्थेचे विद्रुपीकरण होत आहे. शिक्षण आणि संस्कृतीच्या नावाने ओळखली जाणारी ब्रम्हपुरी आता गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, नशा आणि असुरक्षिततेचे केंद्र बनू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने गांजेटी, नशेबाज आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे हे फक्त त्यांच्या कर्तव्यातील भाग नसून, समाजासमोर असलेली जबाबदारी असून पोलिस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी गांजाबंदी, अवैध धंद्यांचा बीमोड करण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
शहरातील सर्व रस्ते आणि महत्त्वाच्या भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे बसवली जावी आणि त्याद्वारे होणार्या घटना वेळीच हेरून गुन्हेगारांवर त्वरित कारवाई केली जावी. शहराची सुवर्ण प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि समाजाने मिळून या धोक्याविरुद्ध आवाज उठवणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा ब्रम्हपुरीची ओळख अंधारात हरपण्यास वेळ लागणार नाही.