ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात दोन वाघांमध्ये तुंबळ युद्ध

वर्चस्वाच्या लढाईत एका वाघाचा मृत्यू
   

ब्रह्मपुरी / प्रतिनिधी :
          उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या बरडकिन्ही शेतशिवारात दोन वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण संघर्षात एका अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या वाघाने या वाघाचा जंगलातून शेतापर्यंत पाठलाग करून त्याला ठार केले आणि त्यानंतर त्याचा काही भाग खाल्ल्याचेही घटनास्थळावरील दृश्यावरून निष्पन्न झाले आहे.
         बरडकिन्ही येथील शेतकरी पटवारी रामाजी गेडाम हे ३ ऑक्टोबर रोजी आपल्या गट क्रमांक २६२ मधील शेतात गेले असता, त्यांना एका वाघाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ ब्रह्मपुरी वन विभागाला दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक डॉ. महेश गायकवाड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या नेतृत्वात पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, वनरक्षक राजेंद्र भरणे, दिलीप लाडे, सचिन शेंडे, मासाळकर आणि क्षेत्र सहाय्यक राकेश चौधरी यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा रीतसर मोक्का पंचनामा करण्यात आला.
         पंचनाम्यानंतर मृत वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभागात आणण्यात आला. ब्रह्मपुरीचे सहाय्यक आयुक्त संजय बावणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल उरकुडे आणि शंकरपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील यांच्या पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. मृत्यूचे अचूक कारण आणि अधिक तपासासाठी वाघाचा विसरा फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे. 
         मृत वाघ हा दीड ते दोन वर्षांचा नर वाघ असून, दोन वाघांमधील संघर्षातूनच हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक तपशील स्पष्ट होईल. घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावून या भागात कोणत्या दुसऱ्या वाघाने हल्ला केला होता, याचा शोध घेतला जात आहे. 
         — वन विभाग, ब्रह्मपुरी

  Post Views:   269


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी