अर्हेरनवरगावच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा धडक कारवाईचा आदेश
ब्रम्हपुरी तालुक्यात खळबळ; महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १४ (ह) अंतर्गत झाली मोठी कारवाई
ब्रम्हपुरी :
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर आदर्श ठेवणे अपेक्षित असताना, कराचा भरणा न करणे अर्हेरनवरगाव येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांना भलतेच महाग पडले आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन करून घरपट्टी व इतर करांची थकबाकी न भरल्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही सदस्यांना तात्काळ प्रभावाने अपात्र घोषित केले आहे. या धडक कारवाईमुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य ज्ञानेश्वरी मनोज ठेंगरे आणि प्रतिभा प्रकाश राऊत यांच्याकडे ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि इतर करांची रक्कम थकीत होती. प्रशासनाने कराचा भरणा करण्यासाठी निर्धारित मुदत दिली होती, मात्र या मुदतीतही त्यांनी थकबाकी न भरल्याने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत माननीय अप्पर जिल्हाधिकारी, चिमूर यांच्या कार्यालयाकडून रीतसर आदेश व पत्र जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार संबंधित दोन्ही महिला सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद आता रिक्त झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १४ (ह) नुसार, कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याने किंवा त्याच्या कुटुंबाने शासकीय नियम व वेळेनुसार घरपट्टी, पाणीपट्टी किंवा इतर स्थानिक करांचा भरणा करणे बंधनकारक असते. निर्धारित वेळेत कराचा भरणा न केल्यास संबंधित सदस्याला पदावर राहण्याचा अधिकार नसून, त्याला थेट अपात्र ठरवण्याची कायदेशीर तरतूद या कलमांतर्गत आहे. याच कडक नियमाचा बडगा आता या दोन्ही सदस्यांवर उगारण्यात आला आहे.
या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर आणि ग्रामपंचायत स्तरावर जोरदार चर्चा रंगली आहे. सामान्य नागरिकांकडून कर वसुलीसाठी कठोर होणारे प्रशासन आता लोकप्रतिनिधींच्या बाबतीतही तितकेच कडक पावले उचलत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे, शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या इतर लोकप्रतिनिधींचेही धाबे दणाणले आहेत. लोकप्रतिनिधींनी स्वतः आधी वेळेवर कर भरून गावकऱ्यांसमोर आदर्श ठेवायला हवा. या कारवाईमुळे इतर सदस्यांनाही वेळेत कर भरण्याचा आणि नियमांचे पालन करण्याचा एक स्पष्ट व कडक इशारा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आता सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.