०८ जुलै ला ग्रामपंचायत सरपंच पदाचे नव्याने आरक्षण सोडत
ब्रम्हपुरी
ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण दोन महिन्यांपूर्वी माहे एप्रिल मध्ये जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण रद्द करुन नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आता ८ जुलै २०२५रोजी आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गावातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. आरक्षण सोडतीसाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते व इच्छूक उमेदवारांनी तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सतीश मासाळ प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी केले आहे. एप्रिल 2025 रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. कोणती जागा कुणाला सुटली हे स्पष्ट झाल्याने गावगाड्यातील भावी सरपंच कामाला लागले होते. आपल्या वॉर्डासह संपूर्ण गावातील लहान-मोठी कामे करण्यास सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर अनेकांनी जनसंपर्कही वाढविला होता. असे असतानाच शासनाने जाहीर केलेले आरक्षण रद्द केल्याने आतापर्यंत, केलेल्या जनसंपर्क आदी कार्यांवर पाणी फिरले आहे. आता मंगळवार दिनांक ८ जुलै २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथील नवीन प्रशासकीय इमारत पहिला मजला येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. नवीन आरक्षणामुळे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळेल आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे या आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. एकूणच नव्याने आरक्षण जाहीर होणार असल्याने गुडघ्यांला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंचांच्या स्वप्नांना ब्रेक लागला आहे. एप्रिल महिन्यात आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. मात्र, आता पूर्वीचे आरक्षण रद्द झाल्याने ज्यांच्यासाठी जागा आरक्षित होती, त्यांना आता नव्याने जाहीर होणाऱ्या आरक्षणानुसार आपली पुढील योजना ठरवावी लागणार आहे. आता सर्वांच्या नजरा जाहीर होणाऱ्या आरक्षणाकडे लागले आहे.