मालकाच्या निष्काळजीपणामुळे वेल्डिंग कामगाराला उच्च दाबाच्या विजेचा धक्का; दोन्ही हात-पाय गंभीर भाजले

   

ब्रम्हपुरी
        बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीकडे वारंवार लक्ष वेधूनही मालकाने केलेल्या दुर्लक्षामुळे एका तरुण वेल्डिंग कामगाराला आपला जीव धोक्यात घालावा लागला आहे. या अपघातात विशाल गोपाल सेलोटे हा युवक गंभीररीत्या भाजला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे .
        विशाल सेलोटे हा तरुण ब्रम्हपुरी येथील टोल नाक्यासमोर असलेल्या 'सुलभा लॉन रेस्टॉरंट' याचे मालक भिमराव चंदनखेडे यांच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी स्टील वेल्डिंगचे काम करीत होता. कामाच्या जागेवरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असल्याने विशालने मालकाला वारंवार धोक्याची सूचना दिली होती. मात्र, "महावितरण विभागाला मी पाहून घेतो" असे म्हणत मालक भिमराव चंदनखेडेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
     दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास काम करीत असताना विशालला या विद्युत वाहिनीचा जोरदार धक्का लागला. या अपघातात त्याच्या छातीला, दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर विशालला तातडीने ब्रम्हपुरी येथील आस्था हॉस्पिटल आणि त्यानंतर नागपूर येथील निम्स (NIMS) व मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सद्यस्थितीत त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे दाखल करण्यात आले आहे.
         तक्रारीनुसार, सुरुवातीला मालकाने उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १५ दिवस उलटूनही मालकाने कोणतीही आर्थिक मदत केली नाही किंवा साधी माणुसकीही दाखवली नाही. मुलाचे अनेक अवयव निकामी झाल्याने सेलोटे कुटुंब हवालदिल झाले आहे. अपघातानंतर मुलाच्या उपचारासाठी नागपूर येथे व्यस्त असल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचे वडिलांनी अर्जात नमूद केले आहे. मालकाच्या हयगयीमुळे आणि निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे. पोलिसांनी तातडीने विशालचे बयाण नोंदवून घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि संबंधित मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी," अशी मागणी गोपाल माधव सेलोटे यांनी केली आहे. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५ ( ब ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ब्रम्हपुरी पोलीस आता या प्रकरणी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  Post Views:   166




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी