वाघांचा वावर असलेल्या जंगल परिसरात प्रेमीयुगुल सुसाट

वनविभागाच्या सूचनांकडे कानाडोळा
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
 परिसरात प्रेमाची व्याख्या पार बदललेली आहे. प्रेम हे असचं असतं. करतांना ते कळतं नसतं आणि केल्यावर ते उमगतं नसतं. उमगलं तरी समजतं नसतं. पण आपलं वेड मनं आपलचं ऐकत नसते या वाक्यातून प्रेम व्यक्त होत असले तरी परिसरातील प्रेमीयुगलांचे प्रेम हे धोकादायक वळणावर आहे. आपलं न उमगलेलं नवं प्रेम व्यक्त करायला हे प्रेमीयुगल वाघांचा वावर असलेल्या जंगल परिसराचा आडोसा घेत प्रेम व्यक्त करीत आहेत. अगोदरचं वाघांचा वावर असलेल्या या जंगलात कुणी चिटपाखरूही नसतांना हे प्रेमीयुगल सुसाट वेगाने जंगल परिसरात फिरतात. अशावेळेस काही अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने समाजातील प्रतिष्ठित विचारत आहेत. 
 ब्रम्हपुरी तालुक्यात वनक्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्येही या क्षेत्रातील जंगल हे झुडपी व काटेरी स्वरूपाचे आहे. झुडपी जंगल असल्यामुळे या तालुक्यात जंगल परिसरात वाघांची भिती आहे. तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना या घडत असतात. जंगल शिवारात शेती असल्याने अनेक शेतकरी आपल्या प्रपंचासाठी जीव धोक्यात घालुन शेती करतात. नुकतेच आवळगांव येथे हंगामी मोहफुल गोळा करायला गेलेल्या शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. सतत घडत असलेल्या वाघाच्या हल्ल्याने नागरिक व वनविभागही हवालदिल झालेला आहे. हीच दहशत या परिसरातील जंगलात आहे. परंतु बेभान झालेले प्रेमीयुगल कुठलीही तमा न बाळगता या जंगलात प्रेम व्यक्त करायला दुचाकीवर येत असतात. अगोदरचं झुडपी जंगल असल्यामुळे बाजुला असलेला वन्यप्राणीही आपल्याला दिसत नाही. त्यातचं हे प्रेमीयुगल तासनतास जंगलात बसुन प्रेम व्यक्त करीत असतात. त्यामुळे प्रेमीयुगलांनी वाघाची भिती असलेल्या या जंगल परिसरात जाण्याचे टाळावे. सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांनीही वनविभागाच्या सुचनांकडे कानाडोळा करू नये.

  Post Views:   76



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी