ब्रम्हपुरीत ४ आणि ५ जुलै रोजी राष्ट्रीय पातळीवरील 'FISCPCON' कार्यशाळा व कॉन्फरन्सचे आयोजन
देशभरातील २० नामांकित सर्जन करणार मार्गदर्शन; ३५ रुग्णांवर होणार विनामुल्य शस्त्रक्रिया
ब्रम्हपुरी:
स्थानिक लाडुकर सर्जिकल हॉस्पिटल येथे येणाऱ्या ४ व ५ जुलै २०२६ रोजी ‘FISCPCON’ या राष्ट्रीय पातळीवरील विशेष कार्यशाळा व कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कोलोप्रोक्टोलॉजी (ISCP), असोसिएशन ऑफ सर्जन्स नागपूर आणि आय.एम.ए. ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त समन्वयातून हा महत्वपूर्ण वैद्यकीय सोहळा पार पडणार आहे.
या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये देशभरातून कोलोप्रोक्टोलॉजी (coloproctology) क्षेत्रातील २० नामांकित शल्यचिकित्सक (सर्जन्स) उपस्थित राहणार आहेत. ते या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व डॉक्टरांना व सर्जन्सना मार्गदर्शन करतील. या परिषदेत कोलोप्रोक्टोलॉजी विषयाशी संबंधित सर्व जुन्या व नवीन शस्त्रक्रिया पद्धतींवर, आधुनिक तंत्रज्ञानावर सर्वांगीण उहापोह आणि विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे स्थानिक व ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्राला मोठी दिशा मिळेल.
या कॉन्फरन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत येथील ३५ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या रुग्ण संशोधन शिबिरामध्ये ६० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झालेल्या ३५ रुग्णांची निवड करण्यात आली असून, या दोन दिवसीय कार्यशाळेदरम्यान नियोजित तारखेला त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येतील.
या कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ठीक ८.०० वाजता 'कृष्णा सेलिब्रेशन हॉल', ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुब्रजीत दासगुप्ता हे आहेत. प्रमुख पाहुणे माजी आमदार अतुल देशकर, ब्रह्मपुरीचे प्रथम नगराध्यक्ष तथा ने. हि. शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैय्या, ब्रम्हपुरी नगर पालिकेचे नगराध्यक्ष योगेश मिसार, ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ब्रम्हपुरी सारख्या शहरात राष्ट्रीय स्तरावरील एवढी मोठी वैद्यकीय परिषद होणे ही अभिमानाची बाब आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी क्षेत्रातील सर्व डॉक्टरांनी, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लाडुकर सर्जिकल हॉस्पिटलचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर यांनी केले आहे.