खाजगी उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या तरुणीला उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरीच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान; १६२० ग्रॅमची गाठ यशस्वीरित्या काढली!
ब्रह्मपुरी/ महेश पिलारे :
"गरीब असणे हा गुन्हा नाही, पण पैशांअभावी उपचार न मिळणे हा मानवी संवेदनांचा अंत आहे." अशाच एका कठीण प्रसंगातून जाणाऱ्या नागभीड तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणीसाठी ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालय देवदूत ठरले आहे. रुग्णालयातील वैद्यकीय चमूच्या अथक परिश्रमामुळे आणि संवेदनशीलतेमुळे एका तरुणीच्या अंडाशयातील तब्बल १६२० ग्रॅम वजनाची मोठी गाठ (Ovarian Cyst) यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आली. या यशस्वी कामगिरीमुळे केवळ त्या तरुणीला नवीन जीवनदानच मिळाले नाही, तर शासकीय रुग्णालयावरील सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
मिंडाळा (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असलेली २२ वर्षीय कु. वेदश्री रामेश्वर बनपूरकर हिला मागील अनेक दिवसांपासून पोटात असह्य वेदना होत होत्या. दिवसेंदिवस हा त्रास वाढत गेल्याने कुटुंबाने तिला खाजगी रुग्णालयात नेले. तिथे तपासणी अंती डॉक्टरांनी 'पोटात मोठी गाठ (गोळा) झाली असून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल' असा सल्ला दिला. मात्र, खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा अवाढव्य खर्च ऐकून आधीच आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या बनपूरकर कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. "मुलीचा जीव कसा वाचवायचा?" या विवंचनेने आणि हताशतेने या कुटुंबाला अंतर्मुख व्हायला लावले होते.
सर्व दरवाजे बंद झालेले असताना, हे कुटुंब हताश न होता उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे दाखल झाले. रुग्णाची गंभीर अवस्था आणि कुटुंबाची हलाखीची आर्थिक स्थिती पाहून येथील वैद्यकीय अधीक्षकांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीतम खंडाळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने या आव्हानात्मक शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. १२ जून २०२६ रोजी अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया पार पडली. भूलतज्ज्ञ डॉ. ठाकर , सर्जन डॉ. पेशट्टीवार , डॉ. पुष्कर भाई , स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मेघा सावसाकडे , आणि डॉ. रिचा मॅम यांच्यासह नर्सिंग स्टाफ व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कौशल्याची पराकाष्ठा केली. डॉक्टरांच्या या चमूला तरुणीच्या अंडाशयातून तब्बल १६२० ग्रॅम म्हणजेच दीड किलोपेक्षा जास्त वजनाची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आले.
शस्त्रक्रियेनंतर वेदश्रीच्या वेदना थांबल्या असून तिच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. आपल्या मुलीला सुखरूप पाहून तिच्या आई-वडिलांच्या व नातेवाईकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. "पैशांअभावी आम्ही आशा सोडली होती, पण ब्रह्मपुरी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आमच्या मुलीला नवीन आयुष्य दिले," अशा भावना व्यक्त करत रुग्णाच्या नातेवाईकांनी संपूर्ण वैद्यकीय चमूचे जाहीर आभार मानले आहेत.
ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची मोठी आणि यशस्वी शस्त्रक्रिया मोफत किंवा अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देणे, ही आरोग्य यंत्रणेची संवेदनशीलता दर्शवणारी आहे. ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयाच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यातून आणि सामाजिक स्तरातून त्यांच्यावर प्रशंसेचा वर्षाव होत आहे.