झाडीबोलीतून डिजिटल जगतावर अधिराज्य गाजवणारी ब्रह्मपुरीची 'हौशी'
ग्रामीण प्रतिभेचा प्रेरणादायी प्रवास
ब्रह्मपुरी/ महेश पिलारे :
ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अत्यंत प्रतिभासंपन्न असतात. त्यांना आपल्यातील कला आणि कौशल्य सादर करण्यासाठी योग्य संधी मिळाली, तर ते त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाहीत. याचेच एक उत्तम उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे. कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो' या उक्तीप्रमाणे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत शिक्षणासोबतच आपल्या अंगातील कला डिजिटल प्लॅटफॉर्मवर सादर करून अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, ती ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा येथील एका हौशी कलाकाराने! खरकाडा गावात 'हौशी' या नावाने प्रचलित असलेल्या, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्नेहा सोमेश्वर ठाकरे हिची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.
माणसाच्या अंगात एखादी कला असली की ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या उक्तीप्रमाणे, स्नेहा हिला लहानपणापासूनच रंगमंचावर नाटक, वेशभूषा आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची आवड होती. बालवयातील शिक्षणापासून ते माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत शाळेने तिला व्यासपीठ निर्माण करून दिले. परंतु, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम वर्षातून एकदाच होत असल्याने, आपली कला लोकांसमोर नियमित सादर करण्यासाठी एखादा चांगला रंगमंच मिळावा यासाठी ती धडपडत होती.
म्हणतात ना, 'शोधले तर देवही सापडतो'; तसेच काहीसे स्नेहाच्या बाबतीत घडले. तिची कला सादर करण्यासाठी तिला इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक यांसारखे डिजिटल प्लॅटफॉर्म मिळाले. शेतकरी कुटुंबातील वातावरणामुळे स्थानिक झाडीबोली भाषा तिच्या सहज वळणी आली होती. तिने या झाडीबोली भाषेतील कॉमेडी रील्स, डेली ब्लॉग्स, कॉलेज जीवनातील प्रसंग, प्रवासवर्णने, शेतीविषयीचे ब्लॉग्स आणि कौटुंबिक संवाद डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यांत तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्रत्येकी १४ हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले असून तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे इन्स्टाग्राम haushii0 व फेसबुक वर Haushii Funclub या नावाने अकाऊंट आहेत.
स्नेहा सध्या नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेच्या ने. हि. महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे बी.कॉम. तृतीय वर्षात शिकत आहे. शिक्षणासोबतच ती आपल्या कलेची आवडही जपत आहे. तिच्या या डिजिटल प्रवासाची दखल घेऊन तिला शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधीही मिळाली आहे. स्नेहा स्वतः रील्स तयार करते, तर ब्लॉग्स बनवण्यासाठी तिचे मित्र-मैत्रिणी तिला मदत करतात. शिक्षणासोबतच कलेची जोपासना करत ती विविध दुकानांच्या जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्नही मिळवत आहे. सध्या स्नेहाने मोबाईलला केवळ मनोरंजनाचे साधन न ठेवता, त्याला स्वतःच्या स्वावलंबनाचे आणि कमाईचे साधन बनवले आहे. भविष्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असून 'स्टँड-अप कॉमेडियन' बनणे हे आपले ध्येय असल्याचे तिने सांगितले.