बहुआयामी व्यक्तिमत्व ॲड. गोविंदराव भेंडारकर काळाच्या पडद्याआड

   

ब्रह्मपुरी :
          चंद्रपूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष, प्रसिद्ध विधिज्ञ, अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागातील पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्रह्मपुरी विधानसभा माजी अध्यक्ष, माजी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अशी बहुआयामी ओळख असलेले तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून समाजपरिवर्तनाची प्रेरणा देणारे, तसेच अनेक सामाजिक, प्रगतिशील आंदोलनांत हिरिरीने सहभागी झालेले ॲड. गोविंद बाबुराव भेंडारकर (वय ६६) यांचे दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
          गोसेखुर्द धरण पूर्णत्वासाठी त्यांनी न्यायालयात तसेच रस्त्यावर उतरून प्रदीर्घ लढा दिला. कुणबी समाजातील सर्व पोट जातींना एकत्र करून समाजाची मोट बांधण्याचे काम त्यांनी केले. गोसेखुर्द पाण्याचा प्रश्न वेगळ्या विदर्भाचे आंदोलन, ओबीसी आंदोलनाचा लढा, ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे आदी. अनेक आंदोलनात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतले. कायदेविषयक जाण, संयमी स्वभाव आणि धडाडीची कार्यशैली यामुळे गोविंदराव कार्यकर्त्यांपासून ते विविध सामाजिक स्तरात अत्यंत लोकप्रिय होते. गेल्या काही वर्षांपासून ते ब्रह्मपुरी येथे वास्तव्य करत होते. 
       स्थानिक प्रश्न, शेतकरी-धरणग्रस्तांचे हक्क, सामाजिक न्याय आणि प्रगतिशील मूल्यांसाठी ते आयुष्यभर झटत राहिले. सामाजिक चळवळींना दिशा देणारे, वैचारिक रेखाटन दृढ करणारे आणि संघर्षमय नेतृत्वाचा आदर्श निर्माण करणारे ॲड. भेंडारकर यांच्या निधनाने नागभीड-ब्रम्हपुरी परिसरासह चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतिशील क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे पार्थिव ब्रह्मपुरी येथील त्यांच्या निवासस्थानाहून आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ला दुपारी ०१ काढण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी भूतीनाला ब्रम्हपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  Post Views:   473




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी