मालडोंगरी परिसरातून १.२७ लाखांचे जर्मन विद्युत तार लांबवली; अज्ञात चोरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
ब्रह्मपुरी :
नागभीड तालुक्यातील वाढोना येथील रहिवासी आणि विद्युत ठेकेदार सारंग जीवन बोरकर (वय ३४) यांच्या मालडोंगरी ते धानोली पोहा चक लाईट लाईनच्या कामावरील तब्बल १ लाख २७ हजार ८४२ रुपये किमतीची जर्मन तार अज्ञात चोरांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारंग बोरकर हे सध्या अशोका बिल्डकॉन कंपनीतर्फे उदापूर विद्युत फीडर अंतर्गत निजी ठेकेदार म्हणून काम पाहतात. मालडोंगरी ते धानोली पोहा चक दरम्यान १५ पोलवर जर्मन वायर टाकण्याचे काम सुरू होते. तसेच काही अतिरिक्त साहित्य मालडोंगरी येथील रहिवासी गोकुलदास ढोंगे यांच्या अंगणात ठेवले होते. १ सप्टेंबरला दुपारी कामाची पाहणी करून काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर ४ सप्टेंबरला ठेकेदार कामानिमित्त चंद्रपूरला गेले असता, ५ सप्टेंबरच्या सकाळी सुपरवायझर जगदीश ठाकरे हे साईटवर पोहोचले. त्यावेळी त्यांना पोलवर टाकलेली तार कापून नेल्याचे आणि ढोंगे यांच्या अंगणातील तारेचे ३ छोटे बंडल गायब असल्याचे दिसून आले.
अज्ञातांनी १ ते ५ सप्टेंबर दरम्यान संधी साधून एकूण ३८० किलो वजनाची (सुमारे २,४७५ मीटर) जर्मन तार पळवून नेली. या चोरीची माहिती मिळताच ठेकेदाराने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तोंडी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरावर भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.