महामोर्चाची धडक, सरकारचे वाभाडे; जनआक्रोशाने दणाणली ब्रह्मपुरी!

   


  • आमदार विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा आक्रोश; जुलमी धोरणांविरोधात तहसीलवर धडकला विराट मोर्चा

ब्रह्मपुरी / प्रतिनिधी :
       शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात गुरुवारी (६ ऑगस्ट) ब्रह्मपुरीत जनआक्रोशाचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित 'जनआक्रोश महामोर्चा'ने संपूर्ण शहर दणाणून सोडले. विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली तालुक्यातील हजारो नागरिक, शेतकरी आणि तरुण रस्त्यावर उतरले.
           नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या पटांगणातून निघालेला हा मोर्चा अशोक सम्राट चौक, बाजार चौक, मर्दान अली चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे थेट तहसील कार्यालयावर धडकला. हातात मागण्यांचे फलक आणि सरकारच्या विरोधात गगनभेदी घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर हादरवून सोडला.
           विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर थेट ताशेरे ओढत म्हटले की, "हे सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे. अन्यायाची परिसिमा गाठणाऱ्या या शासनाला जागे करण्यासाठीच हा जनआक्रोश आहे. सरकारने तातडीने जनहिताचे निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने राज्यभर तीव्र संघर्ष छेडला जाईल. त्यांनी सरकारवर जोरदार घणाघात करताना म्हणाले की, "स्मार्ट मीटरची सक्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने घरी येऊन मीटर लावल्यास, त्यांना व त्या स्मार्ट मीटरलासुद्धा फोडा! कोणीही तक्रार केल्यास मला सांगा, मी पाहून घेईन." भाजप सरकारने जनतेच्या हिताऐवजी मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी सत्तेचा वापर केला असून संपूर्ण देश महागाई आणि बेरोजगारीच्या खाईत लोटल्याचा आरोप त्यांनी केला.
          वडेट्टीवार यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. निवडणुकीपूर्वी 'लाडकी बहीण' योजनेची आश्वासने देऊन सत्तेत आल्यावर सुमारे १ कोटी महिलांना या योजनेतून वगळण्यात आले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही आणि कर्जमाफीची घोषणा पूर्णपणे फसवी ठरली आहे.
 राज्यात ४० टक्के कमिशनशिवाय काम होत नाही. समृद्धी महामार्गाच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन कमी मोबदल्यात लाटण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
           यावेळी युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरण व शिक्षण व्यवस्थेच्या ढासळत्या दर्जावरून सरकारला धारेवर धरले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर आणि राजेश कांबळे यांनीही शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.
               मोर्चाच्या समारोपानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये वाढती महागाई आटोक्यात आणणे. बेरोजगारांना तातडीने रोजगार उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांना पिकांना योग्य हमीभाव देणे. महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे. आदी मागण्याचा निवेदनात समावेश होता.
             या जनआक्रोश महामोर्चाला मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, योगेश मिसार, डॉ. नितीन उराडे, मोंटू पिलारे, सोनू नाकतोडे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, शेतमजूर आणि युवक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ब्रह्मपुरीतील या आक्रोशाने सरकारला स्पष्ट आणि थेट इशारा दिला आहे.

  Post Views:   842


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी