तलावातील त्या गुढ पिवळ्या प्रकाशाने नागरिक चक्रावले: रुपाळा मेंढा येथील छोट्या तलावावर गर्दी, पोलीस दाखल; श्रद्धेची अन् रहस्याची उडाली खळबळ!

   

ब्रह्मपुरी/ महेश पिलारे :
            ब्रह्मपुरी तालुक्यातील जवराबोडी मेंढा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रुपाळा मेंढा (आकापूर) गावात सध्या एका अद्भूत आणि रहस्यमय घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गावाशेजारी असलेल्या एका छोट्या तलावात मागील तीन - चार दिवसांपासून पाण्यात पिवळसर रंगाचा प्रकाश दर एक मिनिटाच्या अंतराने लुपलूपताना दिसत आहे. या अचानक घडणाऱ्या प्रकारामुळे नागरिक जसे आश्चर्य व्यक्त करत आहेत, तसेच तलावा जवळच हनुमानाचे मंदिर असल्यामुळे काहींकडून याकडे श्रद्धेच्या नजरेनेही पाहिले जात आहे.
            रुपाळा मेंढा येथील हा छोटा तलाव ग्रामस्थ दैनंदिन वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापरतात. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी या तलावाच्या पाण्यातून पिवळसर रंगाचा मंद प्रकाश दर मिनिटाला लुपलूपताना (ब्लिंक होताना) दिसतो. पाण्याचा तळ येथून अचानक असा प्रकाश बाहेर पडत असल्याचे पाहून गावकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.
            पाण्यातील या पिवळसर प्रकाशाचे नेमके रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी रुपाळा मेंढा (आकापूर) सह सभोवतालच्या चौगान, जुगनाळा, गवर्ला, जवाराबोडी आणि कसर्ला या परिसरातील नागरिकांनी तलावाभोवती प्रचंड गर्दी केली आहे. हा काय प्रकार असावा? हा एखादा तांत्रिक चमत्कार आहे की निसर्गाची नवीन किमया? हे उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी रात्रीच्या सुमारास तलावाच्या दिशेने नागरिकांचे लोटच्या लोट येत आहेत.
              या अनोख्या घटनेवर वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. पाण्याखाली कोणताही नेहमीचा प्रकाशस्रोत नसताना दर मिनिटाला पिवळा प्रकाश कसा काय दिसतो, यावर अनेकांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे, काही भाविक व ज्येष्ठ नागरिकांनी या घटनेला श्रद्धेची किनार जोडली असून, तलावात काही दैवी किंवा अलौकिक शक्तीचा वास असावा असा दावा करत पूजा-प्रार्थनेचा भाग म्हणूनही याकडे पाहण्यास सुरुवात केली आहे.
             तलावावर नागरिकांची वाढती गर्दी आणि उडालेली खळबळ लक्षात घेताच मेंडकी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तलावाच्या परिसराची पाहणी केली असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हा पिवळसर प्रकाश म्हणजे एखाद्या बॅटरी/इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा पाडलेला प्रकाश आहे, पाण्यातील काही रासायनिक किंवा जैविक घटकांमुळे घडणारा प्रकार आहे, की खरोखरच यात काही गूढ दडले आहे? यामागील सत्य काय, याचे रहस्य उलगडण्यासाठी सर्वच जण आता उत्सुक आहेत.

  Post Views:   1753


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी