सावधान! महामार्गावर रस्ता ओलांडणे ठरले जीवघेणे; किन्ही फाट्याजवळ एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

   

ब्रह्मपुरी /प्रतिनिधी :
               रस्त्यावरील रस्ता ओलांडताना एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६५ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही गावाजवळ, ब्रह्मपुरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडला. कचरू शंकर अवसरे (वय ६५, रा. मांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
         गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगली येथील रहिवासी कचरू अवसरे हे आज दुपारी काही कामानिमित्त किन्ही गावात गेले होते. काम आटोपून आपल्या स्वगावी मांगली येथे परत जात असताना, किन्ही गावालगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता पार करत असताना त्यांनी दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांकडे लक्ष दिलेलं नाही त्याच वेळी, गडचिरोलीकडून ब्रह्मपुरीकडे भरधाव येत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ब्रह्मपुरी आगाराच्या बसने (क्रमांक एम.एच. 14 एम. एच. 0352) अचानक समोर आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी बसच्या खाली आल्याने कचरू अवसरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
          अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक व प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. महामार्गावरील दुभाजक ओलांडताना वाहनधारकांनी काळजीपूर्वक दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊनच रस्ता पार करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  Post Views:   1456


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी